|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » चीनची अरुणाचलवर वक्रदृष्टी?

चीनची अरुणाचलवर वक्रदृष्टी? 

वृत्तसंस्था / बीजिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीला एक महिना देखील उलटलेला नसताना अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा तणाव वाढणार आहे. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवरील स्वतःच्या भागात चीनने मोठय़ा प्रमाणावर खनन कार्य सुरू केले आहे. या क्षेत्रात सोने, चांदी आणि अन्य मूल्यवान खनिजांचा मोठा साठा आढळला असून याचे मूल्य सुमारे 60 अब्ज डॉलर्स असल्याचा अनुमान आहे.

 साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार भारतीय सीमेला लागून असलेल्या लुंझ काउंटीमध्ये खनन प्रकल्पावर काम सुरू आहे. चीन अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा सांगत आला आहे. अशा स्थितीत सीमेला लागून असलेल्या या भागातील या प्रकल्पामुळे डोकलामनंतर दोन्ही देशांदरम्यान पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊ शकतो.

अरुणाचलला धोका

अरुणाचल प्रदेशला स्वतःच्या ताब्यात घेण्याच्या धोरणाचा भाग म्हणून हा खनन प्रकल्प चीनकडून राबविण्यात येत असल्याचा दावा वृत्तपत्राने केला. खाणी बीजिंगच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग असून याद्वारे दक्षिण तिबेट क्षेत्रावरील स्वतःचा दावा बळकट करता येईल, असे प्रकल्पाशी संबंधित व्यक्तींचे म्हणणे आहे.

वादाचा नवा मुद्दा

क्षेत्रातील नैसर्गिक साधनसंपदेवर चीनचा दावा दर्शविण्याचा प्रयत्न आणि वेगाने निर्मितीकार्य केल्याने हा भाग वादाचे नवे कारण ठरू शकतो. चीनच्या भूगर्भशास्त्र आणि सामरिक तज्ञांनी भागाचा दौरा केल्याची माहिती समोर आली आहे.

Related posts: