|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » हाफिज संबंधीचा अहवाल चीनने फेटाळला

हाफिज संबंधीचा अहवाल चीनने फेटाळला 

बीजिंग / वृत्तसंस्था :

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानच्या बाहेर पश्चिम आशियाच्या एखाद्या देशात पाठविण्याच्या वृत्त अहवालावर चीनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अशाप्रकारचे वृत्त आधारहीन आणि भ्रामक असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाने सांगितले. अशी कोणतीही सूचना अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याकडून पाकिस्तानला करण्यात आली नसल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

चीनने हाफिज सईदला पश्चिम आशियाच्या एखाद्या देशात हलवण्याची सूचना केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. जिनपिंग यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबतच्या भेटीदरम्यान ही सूचना केल्याचा दावा वृत्तात करण्यात आला. मुंबईवरील हल्ल्यांचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा म्होरक्यावर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्याने चीनने ही सूचना केल्याचे बोलले गेले.

हाफिजच्या विरोधात अमेरिकेने 1 कोटी डॉलर्सचे इनाम घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वीच पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे मान्य केले होते.

बीओएओ परिषदेवेळी चीनच्या अध्यक्षांनी पाक पंतप्रधानांना ही सूचना केल्याचे सांगण्यात आले. पाक पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या गोटातूनच हे वृत्त समोर आल्याने चीनचे स्पष्टीकरण संशयास्पद ठरले आहे. चीनने दहशतवादाच्या मुद्यावर अनेकदा पाकिस्तानचा बचाव केला आहे. पाकिस्तानातील प्रचंड गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी चीन अशी भूमिका घेत असल्याचे मानले जाते.

Related posts: