|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » वादळी वाऱयांनी दिली ‘मान्सूनपूर्व’ची चाहूल

वादळी वाऱयांनी दिली ‘मान्सूनपूर्व’ची चाहूल 

समुद्र खवळलेला : बंदर विभागाकडून दोन नंबरचा बावटा  : मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

प्रतिनिधी / मालवण:

अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाच्या हालचालींनी जोर पकडला आहे. वादळी वाऱयांमुळे समुद्र शुक्रवारी खवळलेला होता. यामुळे बंदर विभागाकडून दोन नंबरचा धोका दर्शविणारा बावटा लावण्यात आला आहे. तसेच पर्यटक व्यावसायिक आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्रीपासून वादळी वारे सुरू झाले आहेत. लाटा जोरदारपणे किनाऱयावर धडकत आहेत.

समुद्र खवळलेला असल्याने सर्वत्र खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जात असताना रॉक गार्डन परिसरात दाखल झालेल्या पर्यटकांकडून मात्र समुद्राच्या लाटा अंगावर घेण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती. यंदाचा पर्यटन हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना गेले काही दिवस हजारोंच्या संख्येने पर्यटक मालवणात दाखल झाले आहेत. यामुळे किनारे फुल्ल झाले आहेत. समुद्र खवळलेला असल्याने स्कुबा डायव्हींग बंद ठेवण्यात आले होते.

तीन मीटरच्या लाटा धडकण्याची शक्यता

भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून गुरुवारी दुपारी 12 वाजता वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मालवण ते वसई या किनाऱयावर 3 ते 3.20 मीटर उंचीच्या लाटा आणि 24 मे रोजी रात्री 8.30 वाजता ते 26 मे रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत उसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या कालावधीत मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षातून आलेल्या दूरध्वनी संदेशानुसार सर्व शासकीय विभागांना तहसीलदार समीर घारे यांनी खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. तसेच गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सर्व समुद्र किनाऱयावरील गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना माहिती देऊन कोणीही वरील कालावधीत मच्छीमारीसाठी किंवा पर्यटनासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटिसा

अतिवृष्टीमुळे पूर येण्याची शक्यता असलेल्या गावातील लोकांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा तहसीलदारांनी बजावल्या आहेत. यात गेल्या काही वर्षांमध्ये फटका बसलेल्या गावांचा समावेश आहे. मौजे कावावाडी (मसुरे), खोतजुवा, सय्यदजुवा, उसलाटवाडी (मर्डे) टोकळवाडी, मळावाडी येथील ग्रामस्थांना नोटीस बजावून स्थलांतर करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे.

किल्ला होडी सेवेला मुदतवाढीची मागणी

2016-17 या वर्षी 25 मेनंतर बंदर विभागाने हवामानाचा अंदाज घेऊन किल्ला होडी चालविण्यास परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे 25 मे 2018 नंतर हवामानाचा अंदाज घेऊन प्रत्येक दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी. आमच्या या मागणीचा अर्ज आपल्या कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयास पाठवावा व हंगामी वाढ मिळावी, अशी मागणी बंदर निरीक्षकांकडे किल्ला होडी सेवा वेल्फेअर असोसिएशन व दांडी येथील किल्ला होडी सेवा यांच्यावतीने करण्यात आली आहे. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सहाय्यक बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी स्पष्ट केले.

गुन्हे का दाखल करू नये?

2018 च्या मान्सूनपूर्व तयारीसाठी 18 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीला कस्टम अधिकारी, वीज वितरण आचरा व मालवण कार्यालय प्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, बंदर निरीक्षक हे विभागप्रमुख उपस्थित राहिले नाहीत. तसेच सदर बैठकीस त्यांचे प्रतिनिधी देखील हजर नव्हते. या अनुपस्थितीबाबत तोंडी अथवा लेखी कळविण्यात आले नाही. यावरून नैसर्गिक आपत्तीसारख्या महत्वाच्या विषयाकडे सदर विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांच्याविरुद्ध नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 मध्ये नमूद केल्यानुसार गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस तहसीलदार समीर घारे यांनी सर्व विभाग प्रमुखांना बजावली आहे. या अनुपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱयांकडे अहवाल का सादर करण्यात येऊ नये, याबाबतचे म्हणणे समक्ष सादर करावे. अन्यथा आपले काही म्हणणे नाही, असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही तहसीलदारांनी नोटिसीमध्ये म्हटले आहे.