|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडला 56 धावांची आघाडी

इंग्लंडला 56 धावांची आघाडी 

पाकिस्तानविरुद्ध पहिली कसोटी, तिसरा दिवस: कर्णधार रुट, जोस बटलर, डॉमिनक बेसची अर्धशतके

वृत्तसंस्था/ लंडन

येथील लॉर्ड्स मैदानावर सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवशी इंग्लंडला नाममात्र 56 धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 78 षटकांत 6 बाद 235 धावा जमवल्या होत्या. दिवसअखेरीस जोस बटलर 66 व डॉमनिक बेस 55 धावांवर खेळत होते. पराभव टाळण्यासाठी चोथ्या दिवशी बटलर व बेस जोडीवर इंग्लंडच्या आशा असतील.

तत्पूर्वी, पाकिस्तानने 8 बाद 350 धावसंख्येवरुन तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. पण अवघ्या 13 धावांची भर घातल्यानंतर पाकचा पहिला डाव 114.3 षटकांत 363 धावांवर संपुष्टात आला व त्यांनी 179 धावांची आघाडी घेतली. पाकतर्फे बाबर आझमने सर्वाधिक 68 धावा फटकावल्या. अझहर अली (50), असद शफीक (59) व शादाब खान (52) यांनी शानदार अर्धशतके झळकावत पाकच्या डावाला आकार दिला. इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसन व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मार्क वूडने 2 गडी मिळवले.

दुसऱया डावात खेळताना यजमान इंग्लंडची मात्र घसरगुंडी उडाली. सलामीवीर ऍलेस्टर कूक (1) व मार्क स्टोनमन (9) ही सलामीची जोडी झटपट बाद झाली. यानंतर, कर्णधार ज्यो रुटने अर्धशतकी खेळी साकारत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रुटने 120 चेंडूत 8 चौकारासह 68 धावा फटकावल्या. मात्र, मोहम्मद अब्बासच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. यानंतर, डेव्हिड मालन (12), जॉनी बेअरस्टो (0) व बेन स्टोक्स (9) या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्याने इंग्लंडची एकवेळ 6 बाद 110 अशी बिकट स्थिती झाली होती. मात्र, जोस बटलर व डॉमनिक बेस यांनी सातव्या गडय़ासाठी 125 धावांची भागीदारी करत दिवसअखेरीस आणखी पडझड होऊन दिली नाही.  तिसऱया दिवशीचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 78 षटकांत 6 बाद 235 धावा केल्या होत्या. बटलर 6 चौकारासह 66 तर बेस 8 चौकारासह 55 धावांवर खेळत होता. इंग्लंडकडे आता नाममात्र 56 धावांची आघाडी असून पराभव टाळण्यासाठी चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या उभी करणे गरजेचे आहे. पाकतर्फे मोहम्मद अमीर, मोहम्मद अब्बास व शादाब खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प.डाव 184 व दु.डाव 78 षटकांत 6 बाद 235 (ऍलेस्टर कूक 1, मार्क स्टोनमन 9, ज्यो रुट 68, डेव्हिड मालन 12, जॉनी बेअरस्टो 0, बेन स्टोक्स 9, जोस बटलर खेळत आहे 66, डॉमनिक बेस खेळत आहे 55, मोहम्मद अमीर 2/35, मोहम्मद अब्बास 2/36, शादाब खान 2/63