|Sunday, February 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दिल्ली-मेरठ द्रुतमार्गांचे शानदार उद्घाटन

दिल्ली-मेरठ द्रुतमार्गांचे शानदार उद्घाटन 

घराणेशाही, विकासविरोधावर पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्ली ते उत्तर प्रदेशातील मेरठ पर्यंतच्या दोन द्रुतगती महामार्गांचे उद्घाटन एका भव्य सोहळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. 11 हजार कोटी रुपये खर्चाचा हा 14 पदरी महामार्ग प्रकल्प अवघ्या 18 महिन्यांच्या विक्रमी अल्पावधीत पूर्ण करण्यात आला असून तो देशातील पहिला अत्याधुनिक आणि हरित प्रकल्प ठरला आहे. उद्घाटनानंतर मोदींनी या मार्गावरून रोड शो केला आणि प्रचंड जाहीर सभेत भाषणही केले. भाषणात त्यांनी विकास हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.

हा महामार्ग दिल्लीच्या निझामुद्दीन सेतूपासून उत्तर प्रदेशच्या सीमेपर्यंत आहे. या प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्याची लांबी 135 किलोमीटर असून त्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे दिल्ली ते उत्तर प्रदेश हे अंतर निम्म्या कालावधीने कमी होणार असून इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रण या दोन्ही दृष्टींनी तो लाभदायक आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

नोव्हेंबर 2015 मध्ये मोदींनी या प्रकल्पाची कोनशीला प्रस्थापित केली होती. त्यानंतर काही महिन्यांमध्ये कामाला प्रारंभ करण्यात आला होता. या महामार्गामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असून रहदारीचे प्रमाण त्यामुळे बरेच कमी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाच्या वैशिष्टय़ांवर नंतरच्या जाहीर सभेत प्रकाश टाकला, तसेच सरकारच्या इतर योजनाही घोषित केल्या.

2006 मध्ये योजना, पण…

सर्वोच्च न्यायालयाने 2006 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारला दिल्लीच्या बाहेरून रिंग रोड बांधण्याची सूचना प्रदूषण नियंत्रणासाठी केली होती. त्यानुसार 2006 मध्येच या मार्गाची योजना तयार करण्यात आली होती. तथापि, त्यावेळच्या सरकाच्या दिरंगाईमुळे 2014 पर्यंत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला नव्हता. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या प्रकल्पात प्राधान्याने लक्ष घालून तो विक्रमी अल्पवेळेत पूर्ण केला.

मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

दिल्ली-मेरठ द्रुतमार्ग आणि इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी उत्तर प्रदेशातील बाघपत येथे भव्य जाहीर सभेत भाषण केले. आपल्या सरकारने देशाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला असून त्या दिशेने झपाटय़ाने काम केले आहे. गेल्या चार वर्षांमध्ये अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. काँगेस मात्र सरकारने दलित आणि गरिबांसाठी केलेल्या कामांची थट्टा उडवत आहे. काँगेसकडून विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात असून विकासाभिमुख धोरणांचा अवमान करण्यास तो पक्ष मागेपुढे पहात नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

विरोधकांसाठी सारेच ‘विनोद’

विरोधकांचे काम आजकाल केवळ प्रत्येक बाबीची चेष्टा करणे हेच राहिले आहे. त्यांच्यासाठी महिलांसाठी बांधलेले शौचालये हा विनोद आहे. स्वच्छ भारत मोहीम हा विनोद आहे, ग्रामीण गरिबांना विनामूल्य गॅस जोडणी हा विनोद, जनधन योजना हा विनोद आणि अनुदानांचे थेट खात्यांवर वितरण हाही विनोदच असल्याचे वाटते, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

घराणेशाही देशाला घातक

माझ्यासाठी देश हेच कुटुंब आहे, तर एका विरोधी पक्षासाठी कुटुंब हाच देश आहे, अशी टिप्पणी मोदींनी काँगेस आणि नेहरू-गांधी घराण्याचे नाव न घेता केली. घराणेशाही देशाला घातक असून ती विकासविरोधी धोरणांचे प्रतिक आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारने आघाडी उघडली असल्याने विरोधक बिथरून गेले आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला.

द्रुतगती मार्गाची वैशिष्टय़े…

ड पहिल्या टप्प्याची पूर्तता अवघ्या 18 महिन्यांमध्ये

ड द्रुतगती प्रकल्पाचा एकंदर खर्च 11 हजार कोटी

ड पूर्णत्वानंतर दिल्ली-मेरठ अंतर केवळ 40 मिनिटे

ड दिल्लीच्या प्रदुषणात तब्बल 27 टक्के घट होणार

ड पंजाब-उत्तर प्रदेश प्रवास आता दिल्ली टाळून शक्य

ड दिल्ली अंतरभागातील वाहनांची ये-जा कमी होणार

ड 14 पदरी असलेला हा भारतातील पहिलाच प्रकल्प

ड देशातील प्रथमच स्मार्ट आणि हरित द्रुतगती मार्ग

Related posts: