|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वादळी वाऱयाचा ‘तडाखा’ पण वळिवाचा ‘दिलासा’

वादळी वाऱयाचा ‘तडाखा’ पण वळिवाचा ‘दिलासा’ 

वार्ताहर/ निपाणी

वाढत्या उष्णतेतून अंगाची होणारी लाही लाही, गळणाऱया घामांच्या धारा यामुळे प्रत्येकजण गारवा देणारा वळिवाचा पाऊस बरसणार कधी याचीच चिंता करत होता. तोच सोमवारी सायंकाळी 4 नंतर वातावरणात बदल होत ढग जमून आले अन् 5 वाजता निपाणीसह परिसरात वळिवाच्या पावसाने दिलासा देणाऱया गारांसह बरसात केली. ही बरसात सुरू असतानाच झालेल्या वादळी वाऱयाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत होऊन लाखोंची हानी केली.

सुमारे एक तास झालेल्या वळिवाच्या पावसाने परिसराला चिंब करून सोडले. मोठय़ा प्रमाणात झालेल्या या पावसाने पाण्याचा निचरा न झालेल्या ठिकाणी समस्या वाढविल्या. शहर, उपनगरे व ग्रामीण भागात अनेक घरात पाणी शिरले. गटारी तुंबल्याने निर्माण झालेल्या या समस्येने संताप व्यक्त होत होता.

वळिवाच्या पावसाची बरसात सुरु असतानाच ढगांचा गडगडाट व विजेचा कडकडाट सुरु झाला. याचवेळी वादळी वारा सुरु झाल्याने अनेक घरांचे पत्रे उडून गेले. हरिनगरातील पत्र्याचे शेड जमीनदोस्त झाले. विजेचे खांब उन्मळून पडले. श्रीपेवाडी येथे व्हीएसएम अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील दुकान, धाब्याचे पत्रे उडून जाऊन मोठे नुकसान झाले. यामुळे वळिवाचा दिलासा पण वादळी वाऱयाचा तडाखा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

आंदोलननगर ओढा तुंबला

आंदोलननगर ओढय़ाला संभाजीनगर, बसवाननगर, शाहूनगर, प्रगती नगर, आश्रय नगर परिसरातील पावसाचे पाणी येते. या ओढय़ाचे बांधकाम अर्धवटरित्या थांबल्याने पाणी तुंबून परिसरातील शेतजमिनीत गेले. ओढय़ाची स्वच्छता न केल्याने साचलेल्या कचऱयामुळेही पाणी थांबले. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.

Related posts: