|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय जनता पक्षाचा ‘महासंपर्क’

भारतीय जनता पक्षाचा ‘महासंपर्क’ 

‘संपर्क फॉर समर्थन’ मोहिमेचा शुभारंभ   50 महनीयांना भेटणार पक्षाध्यक्ष, माजी सैन्यप्रमुखांशी चर्चा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ मोहीम सुरू करत पुढील वर्षी होणाऱया निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या मोहिमेंतर्गत पक्षाध्यक्ष  अमित शाह यांनी मंगळवारी माजी सैन्यप्रमुख दलबीर सुहाग आणि घटनातज्ञ सुभाष कश्यप यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली आहे.

शाह यांनी सुहाग यांच्या दिल्लीतील मंदिर मार्गमध्ये स्थित निवासस्थानी जात भेट घेतली आणि पक्षाच्या मोहिमेचा शुभारंभ केला. त्यांनी सुहाग यांना मोदी सरकारच्या कामगिरीशी संबंधित काही पुस्तिका देखील भेट केल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रव्यापी मोहीम ‘संपर्क से समर्थन’चे अनावरण केले आहे. घरोघरी जाण्याच्या या पुढाकाराचा उद्देश चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल लोकांना जागरुक करणे असल्याचे शाह यांनी ट्विट करत सांगितले.

शाह हे किमान 50 प्रतिष्ठित व्यक्तींशी वैयक्तिकरित्या संपर्क साधणार आहेत. यांतर्गत केंद्र सरकारच्या लोकोपयोगी कामांबद्दल देशात जागरुकता निर्माण करणे आणि जनतेचे समर्थन मिळविण्यासाठी भाजप प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे. यात बूथ स्तरापर्यंतचा पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी होणार आहे.

2019 च्या निवडणुकीची तयारी

भाजपच्या या मोहिमेला 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी मानली जातेय. यांतर्गत पक्षाचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि पंचायत सदस्य समवेत सुमारे 4000 नेते लोकांना स्वतः भेटणार आहेत. केंद्रीय पक्षनेतृत्वाने प्रत्येक कार्यकर्त्याला किमान 10 जणांशी संपर्क साधून सरकारच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमुळे भाजपला प्रचारात आघाडी मिळू शकते.

नमो ऍपवर सर्वेक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच नमो ऍपवरून एक सर्वेक्षण चालविले असून यात लोकांना केंद्रातील रालोआ सरकारच्या कामकाजाची समीक्षा करून त्याचे मूल्यांकन करण्याची सूचना करण्यात आली आहे. याचबरोबर लोकांना स्वतःच्या मतदारसंघातील खासदार आणि आमदारांसोबत संवाद साधण्यास सांगण्यात आले असून याद्वारे जनप्रतिनिधी आणि सरकारबद्दलचे लोकांचे मत जाणून घेतले जाईल.