|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एलईटी प्रशिक्षण शिबिराची नवी चित्रफित

एलईटी प्रशिक्षण शिबिराची नवी चित्रफित 

नवी दिल्ली

  : दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने भारतविरोधी कृत्यांसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. पीओकेत सुरू असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या एका प्रशिक्षण केंद्राची चित्रफित समोर आली आहे. या चित्रफितीत दहशतवाद्यांना शस्त्र चालविण्यासोबतच घुसखोरीच्या मार्गाबद्दल माहिती दिली जात असल्याचे दिसून येते. एलईटीची ही नवी चित्रफित साडेचार मिनिटांची आहे. भारतीय सैन्याने सीमेवर तारेचे भक्कम कुंपण उभारले आहे. दहशतवादी संघटनेच्या या नव्या चित्रफितीत दहशतवाद्यांना या तारा कापण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे आढळून येते. याचबरोबर तार न कापता घुसखोरी करण्याची पद्धत देखील शिकविली जात आहे. रमझानकाळात भारतीय सैन्याने शस्त्रसंधीची घोषणा करत शांततेसाठी पुढाकार घेतला आहे. अशा स्थितीत ही चित्रफित पुन्हा एकदा पाकचे कट उघडकीस आणणारी ठरली आहे. 

दहशतवादी सुरक्षा दलांच्या विरोधात मोठय़ा हल्ल्याच्या तयारीत असल्याचे या चित्रफितीतून समोर आले आहे. याअगोदर सोमवारी दहशतवाद्यांनी शोपियांमध्ये आयईडी स्फोट घडवून आणला होता. यात 3 जवान जखमी झाले होते, स्फोटासाठी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला याने आयईडी तयार केल्याचे उघड झाले आहे.

आयईडी निर्माण करतानाची हंजलाची एक चित्रफित हाती लागली आहे. आयईडीने करण्यात आलेला हल्ला हा ग्रेनेड हल्ल्याच्या तुलनेत अधिक धोकादायक असतो. काश्मीर खोऱयात मागील 2-3 वर्षांमध्ये आयईडी स्फोटांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.