|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सरकारविरोधात बँक कर्मचाऱयांचा एल्गार

सरकारविरोधात बँक कर्मचाऱयांचा एल्गार 

कर्मचाऱयांनी दोन दिवसांचा पुकारला संप

प्रतिनिधी/ बेळगाव

पगारवाढीबरोबरच बँक कर्मचाऱयांवरील मानसिक ताण कमी करावा, या मागणीसाठी बँक कर्मचाऱयांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यानिमित्त शहरातून बुधवारी भव्य निषेध रॅली काढण्यात आली. कर्मचाऱयांना त्यांचे हक्क व नियमानुसार पगारवाढ करावी, अशी मागणी कर्मचाऱयांनी लावून धरली. या रॅलीमध्ये 700 ते 800 बँक कर्मचाऱयांनी सहभाग घेतला होता. बुधवार व गुरुवार दोन दिवस बँका बंद असल्याने आर्थिक व्यवहार मंदावले आहेत.

कर्मचाऱयांना वेतनवाढ करावी, सरकारी योजनांचे मानसिक ताण कमी करावेत, गरजेनुसार सुटय़ा द्याव्यात, नवीन कर्मचाऱयांची भरती करावी, यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारकडे मांडण्यात आल्या. लीड बँकेचे मॅनेजर यांना हे निवेदन देण्यात आले. या रॅलीमध्ये बँकांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होते.

धर्मवीर संभाजी चौकापासून किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्लीमार्गे मारुती गल्ली येथील सिंडिकेट बँक येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी एकनाथ गिंडे, आर. के. देशपांडे, फ्रान्सिस फर्नांडिस, मुरली करजगी, शरद करगुप्पीकर, नारायण, विनोद, डी. एल. कुलकर्णी, संपदा हावळ, विजया नाईक, निखिल बागलकोटी, विद्याधर कोरी यांसह इतर संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

बँक कर्मचाऱयांवर विविध योजनांचा भडिमार-एकनाथ गिंडे- (समन्वयक, बँक असोसिएशन)

बँक कर्मचाऱयांवर सरकारकडून विविध योजनांचा भडिमार होत आहे. जन धन योजना, मुद्रा लोन, आधार जोडणी, आधार नोंदणी यासारखी कामेही कर्मचाऱयांनाच करावी लागत आहेत. त्यामुळे या प्रमाणेच त्यांना वेतन देणे गरजेचे आहे.