|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आश्चर्यशृंखला!

आश्चर्यशृंखला! 

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला ।

यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्ति÷न्ति पंगुवत्।।

अन्वय- मनुष्याणांम् आशा नाम काचित् आश्चर्यशृंखला (अस्ति)

याया बद्धाः (ते) प्रधावन्ति (किंन्तु यया) मुक्ताः (तु) पंगुवत् ति÷न्ति ।

अनुवाद : माणसांजवळ आशा नावाची एक आश्चर्यकारक अशी बांधण्याची सांखळी आहे. तिने बांधलेले लोक वेगाने पळत असतात, तर तिच्यातून सुटलेले लोक मात्र पांगळय़ाप्रमाणे गतिहीन (बनून) राहतात.

विवेचन- या सुभाषितात आशा या मानवी भावनेवर एक सुंदर रूपक केलेले आहे, आणि त्यातून मानवी स्वभावावर मार्मिक टिप्पणीही केलेली आहे. आशा ही (माणसाला) बांधून ठेवणारी साखळी जरूर आहे. परंतु ती एक विलक्षणच साखळी आहे. एरवी साखळीत बांधले गेलेले गतिहीन होतात तर साखळीतून मुक्त झालेले चालू/धावू लागतात परंतु या आशारूपी साखळीचे नेमके या विपरीत आहे. आशेच्या पाशात गुरफटलेले लोक काही तरी इष्ट साध्य होईल म्हणून बेफाम धावत असतात, तर जे आशारूपी साखळीतून मुक्त झालेले आहेत म्हणजे एकतर निराश किंवा निरिच्छ झालेले आहेत ते काहीच मिळणार किंवा मिळविण्यासारखे नसल्यामुळे पांगळय़ासारखे एकाच जागी गतिहीन बनून राहतात.

एका दृष्टीने आशाच आपणास कार्यप्रवृत्त करीत असते. आपले आयुष्य काही नेहमीच इष्ट गोष्टींनी युक्त नसते. कित्येकदा परिस्थिती बिकट असते. मनातल्या इच्छा पुऱया होत नाहीत. त्या पुऱया करण्यासाठी आवश्यक ती साधन सामग्री किंवा आर्थिक सुबत्ताही नसते. अशा परिस्थितीत आशाच आपणास धीर देत असते. आशा आपल्या जीवनाची गाडी चालू ठेवते याविषयी एक सुंदर रुपक कथा आठवते. ईश्वराने मानवाची निर्मिती केली आणि त्याला सांगितले, ‘मी तुझे जीवन सुरळीत चालावे, सुखात चालावे म्हणून काही गोष्टी तुला देणार आहे.’ एक बंद पेटारा देऊन तो मानवाला म्हणाला, ‘या पेटाऱयात तुझ्या जीवनाला सुखावह करणाऱया गोष्टी आहेत. माझी एक अट आहे. हा पेटारा आजची रात्र उघडायचा नाही उद्या सकाळी या सर्व वस्तू तुला मिळतील.’ मानवाने कबूल केले परंतु देव अंतर्धान पावल्यावर उत्सुकता अनावर होऊन त्याने पेटाऱयाचे झाकण उघडलेच तेव्हा त्यातून एक एक गोष्ट उडून जाऊ लागली. मग भानावर येऊन त्याने पेटारा गडबडीत बंद केला. सकाळी पुन्हा उघडल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाने दिलेल्या गोष्टींपैकी एकच गोष्ट पेटाऱयात शिल्लक आहे ती म्हणजे ‘आशा’. तेव्हापासून आजवर माणूस आशेवरच जगत आला आहे. अशी आहे ही आश्चर्यशृंखला!