|Sunday, June 16, 2019
You are here: Home » उद्योग » मे महिन्यात वाहन विक्रीत दमदार वाढ

मे महिन्यात वाहन विक्रीत दमदार वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रमुख वाहन कंपन्यांनी मे महिन्यातील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर, फोर्ड इंडिया या कंपन्यांच्या वाहन विक्रीमध्ये वाढ दिसून आली.

देशातील वाहन बाजारपेठेमध्ये वर्चस्व असणाऱया मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीमध्ये 26 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी मे महिन्यात 1,36,962 युनिट्सची विक्री करण्यात आली होती, ती वाढत 1,72,512 युनिट्सवर पोहोचली. कंपनीची देशांतर्गत विक्री वर्षाच्या आधारे 24.9 टक्के, तर निर्यात 48.1 टक्क्यांनी वाढली. कंपनीचा समभाग 3 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

टाटा मोटर्सच्या विक्रीमध्ये 58 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेतील 34,461 युनिट्सवरून विक्री 54,295 युनिट्सवर पोहोचली. प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विक्रीत दमदार वाढ दिसून आली. औद्योगिक वाढ, इन्फ्रास्ट्रक्चर विकास आणि खासगी क्षेत्रातून मागणी वाढल्याने व्यावसायिक वाहनांची विक्री 56 टक्क्यांनी वाढत 36,806 युनिट्सवर पोहोचली. प्रवासी वाहन विक्री 61 टक्क्यांनी वाढत 10,855 वरून 17,489 युनिट्सवर पोहोचली. कंपनीचा समभाग 4.30 टक्क्यांनी मजबूत झाला.

अशोक लेलँडच्या विक्रीमध्ये 51 टक्क्यांनी वाढ होत 13,659 युनिट्सवर पोहोचली. मध्यम आणि अवजड वाहनांच्या विक्रीमध्ये 69 टक्के, तर हलक्या व्यावसायिक वाहन विक्रीत 10 टक्क्यांनी वाढ झाली. टोयोटा किर्लोस्करच्या विक्रीमध्ये 20 टक्क्यांनी वाढ होत 13,113 युनिट्सवर पोहोचला. फोर्ड इंडियाची विक्री 11.42 टक्क्यांनी वाढत 26,503 युनिट्सवर पोहोचली.