|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » ज्योकोव्हिक, नदाल, शरापोव्हाची विजयी आगेकूच

ज्योकोव्हिक, नदाल, शरापोव्हाची विजयी आगेकूच 

शरापोव्हाची लढत आता सेरेनाविरुद्ध, मुगूरुझा, स्टीफन्सही विजयी

वृत्तसंस्था/ पॅरिस

सर्बियाचा नोव्हॅक ज्योकोव्हिक, स्पेनचा राफेल नदाल, रशियाची टेनिसतारका मारिया शरापोव्हा यांनी शनिवारी प्रेंच टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली. स्टीव्हन स्टीफन्स, मुगुरुझा यांनीही दमदार विजय संपादन केले. महिला एकेरीत शरापोव्हाची लढत आता अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सविरुद्ध होईल.

पाचवेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन मारिया शरापोव्हाने पुनरागमनानंतर आपली आणखी एक सर्वोत्तम खेळी साकारली. तिने सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचा 6-2, 6-1 असा फडशा पाडत जवळपास तीन वर्षांनंतर तिने एकतर्फी दमदार विजय साकारला. रशियन टेनिसतारका यापूर्वी 2012 व 2014 प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेती ठरली होती. दोन वर्षांपूर्वी मेल्डोनियमचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळणाऱया शरापोव्हाला यंदा प्रथमच एखाद्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मानांकन प्राप्त झाले आहे.

दमदार खेळ साकारणाऱया या अनुभवी टेनिसपटूने माजी अव्वलमानांकित प्लिस्कोव्हाला जबरदस्त धक्के दिले. अवघ्या 59 मिनिटात निकाली झालेल्या या लढतीत झेकची प्लिस्कोव्हा कुठे लढत देत असल्याचेही चित्र नव्हते. शरापोव्हाची पुढील लढत आता 23 ग्रँडस्लॅम विजयाची मानकरी ठरलेल्या सेरेना विल्यम्सविरुद्ध होईल. शरापोव्हा व सेरेना यापूर्वी 21 वेळा आमनेसामने भिडले असून त्यात सेरेनाने तब्बल 19 वेळा बाजी मारली आहे. त्यातही विशेषतः 2004 पासून तिने सलग 18 विजय नोंदवले आहेत. पण, यंदा शरापोव्हा विशेष बहरात असल्याने तर सेरेना मातृत्व प्राप्त झाल्यानंतर प्रथमच कोर्टवर उतरली असल्याने ही बाब फरक करणारी असेल का, हे तेथे निश्चित होईल.

समंथा स्टोसूरचे आव्हान संपुष्टात

महिला एकेरीतील अन्य लढतीत, स्पेनच्या गॅरबिन मुगूरुझाने ऑस्ट्रेलियाची माजी उपविजेती समंथा स्टोसूरचा 6-0, 6-2 असा फडशा पाडत चौथ्या फेरीत जोरदार धडक मारली. तिसऱया मानांकित मुगूरुझाने पहिला सेट एकतर्फी जिंकला तर दुसऱया सेटमध्येही आपला वरचष्मा कायम राखला. झेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोव्हाचे आव्हान संपुष्टात येणे मात्र धक्कादायक ठरले. तिला ऍनेट कोन्टावेटविरुद्ध 6-7 (6), 6-7 (4) अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. आठव्या मानांकित क्विटोव्हाने येथे प्रारंभी आश्वासक सुरुवात जरुर केली होती. पण, नंतर सामना पुढे सरकत असताना तिला अपयशाचा सामना करावा लागला.

पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोव्हिकने एका सेटची पिछाडी भरुन काढत स्पेनच्या रॉबर्टो बॉतिस्टाचे आव्हान मोडीत काढले. त्याने 6-4, 6-7 (6), 7-6 (4), 6-2 असा फरकाने विजय संपादन करत स्पर्धेच्या तिसऱया फेरीत स्थान प्राप्त केले. 31 वर्षीय ज्योकोव्हिक आतापर्यंत बरीच हुकूमत गाजवण्यात यशस्वी ठरला असला तरी या स्पर्धेत त्याला विजयी आगेकूच कायम ठेवण्यासाठी बरेच झगडावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

तेरावे मानांकन लाभलेल्या बॉतिस्टा आपल्या आईचे निधन झाल्यानंतर काही दिवसातच कोर्टवर उतरला. पण, ज्योकोव्हिकने विशेषतः दुसऱया टप्प्यात त्याच्याविरुद्ध उत्तम वर्चस्व गाजवले. ज्योकोव्हिक 2006 नंतर प्रथमच निचांकी मानांकन असताना खेळत आहे. जागतिक मानांकन यादीत सध्या तो चक्क 22 व्या स्थानापर्यंत खाली घसरला आहे. पण, तरीही एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम 16 खेळाडूत स्थान मिळवण्याची त्याची ही कारकिर्दीतील 43 वी वेळ ठरली आहे. अन्य सामन्यात राफेल नदालने रिचर्ड गॅस्केटची वाटचाल 6-3, 6-2, 6-2 अशा फरकाने संपुष्टात आणली. केव्हिन अँडरसनने झेरेव्हची मोहीम चार सेट्समध्ये रोखली तर फोग्निनीने एडमंडला 6-3, 4-6, 3-6, 6-4, 6-4 असे नमवले.

सेरेना म्हणते, ब्लॅक कॅट सूटमुळे सुपरहिरोसारखे वाटते!

Serena Williams of the U.S. walks back as she plays Australia’s Ashleigh Barty during their second round match of the French Open tennis tournament at the Roland Garros stadium, Thursday, May 31, 2018 in Paris. (AP Photo/Alessandra Tarantino)

मातृत्व प्राप्त झाल्यानंतर प्रथमच एखाद्या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेत खेळणाऱया ‘सुपरमॉम’ सेरेना विल्यम्सचा या स्पर्धेत ब्लॅक कॅट सूट यंदा बराच चर्चेत राहिला असून तिने स्वतः आपण या सूटमध्ये अगदी सहजपणे वावरु शकत असल्याचे सांगितले. या सूटमुळे आपल्याला सुपरहिरोसारखे वाटते, अशी टिपणी तिने गंमतीने केली. ‘मला नेहमीच सुपरहिरो व्हावे, असे वाटायचे. आता या सूटमुळे माझी ती सुप्त इच्छाच जणू साकारली गेली आहे’, असे 36 वर्षीय सेरेनाने यावेळी नमूद केले.

Related posts: