|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महाआघाडी, हाफिजचे मोदींना रोखण्याचे प्रयत्न

महाआघाडी, हाफिजचे मोदींना रोखण्याचे प्रयत्न 

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपविरोधात देशभरात विरोधकांच्या ऐक्याचा प्रयत्न होत असून याप्रकरणी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या एका टिप्पणीने न्वाद निर्माण होऊ शकतो. आतापर्यंत अस्तित्वात न आलेली ‘महाआघाडी’ आणि हाफिज सईद दोघेही नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखू इच्छित असल्याची टिप्पणी पात्रा यांनी केली आहे. वादाची शक्यता पाहता संबित यांनी ही कोणतीही तुलना नसल्याचे स्पष्टीकरण देखील दिले.

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदची एक चित्रफित पात्रा यांनी रविवारी ट्विटद्वारे शेअर केली. या चित्रफितीत हाफिज पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करत धमकी देताना दिसून येतो.  पात्रा यांनी ही चित्रफित पोस्ट करत केवळ आतापर्यंत अस्तित्वात न आलेली महाआघाडीच नव्हे तर आणखी अनेक जण असे आहेत, जे मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखू इच्छित असल्याचे नमूद केले.

काही वेळानंतर संबित पात्रा यांनी स्पष्टीकरण देत आणखी एक ट्विट केला. निश्चितपणे ही तुलना नाही, काळापैसा आणि भ्रष्टाचारावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हल्ल्यामुळे भ्रष्ट विरोधकांना एकत्र यावे लागले आहे. तर दहशतवादावरील आक्रमण आणि सर्जिकल स्ट्राइकने हाफिज सईदला निराशेच्या गर्तेत ढकलले आहे. यातून मोदी सरकार योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे सिद्ध होत असल्याचे पात्रा
म्हणाले. पात्रा हे भाजपच्या मुख्य प्रवक्त्यांपैकी एक आहेत.