|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माणूस कर्तृत्वाने मोठा होतो हे गोंधळी यांनी सिध्द केले

माणूस कर्तृत्वाने मोठा होतो हे गोंधळी यांनी सिध्द केले 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

एम. के. गोंधळी यांनी मोठय़ा कष्टाने आणि जिद्दीने शिक्षक ते शिक्षण उपसंचालक पदापर्यंत झेप घेतली. शिक्षण क्षेत्रातील विविध पदांचा कार्यभार सांभाळताना त्यांनी आपल्यातील बहुआयामी व्यक्तिमत्व जिवंत ठेवले. कर्तृत्व व बुध्दीच्या जोरावर माणूस मोठा होतो, हे त्यांच्या रूपाने सिध्द झाले आहे, असे गौरवोद्गार अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काढले.

एम. के. गोंधळी गौरव समितीच्या वतीने आयोजित माजी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांचा सेवानिवृत्तीबद्दल नागरी सत्कार व ‘म्हणे एमकेजी’ या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सिने दिग्दर्शक चंद्रकांत जोशी अध्यक्षस्थानी होते. हा कार्यक्रम राम गणेश गडकरी सभागृह, पेटाळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

राहुल सोलापूरकर म्हणाले, एम. के. गोंधळी सेवानिवृत्त होताना त्यांनी काय कमवले आणि काय गमावले याचा विचार करता त्यांनी त्यांच्यातील कलाकार कायम जिवंत ठेवला आहे. गोंधळी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तिमत्व आहे. दहावी, बारावी परीक्षेत डमी बसण्याचे प्रकार त्यांनी उघडकीस केल्याने आज कोकण विभाग राज्यात प्रथम आहे व कोल्हापूर राज्यात दुसऱया स्थानावर आहे. समाजात तामसी विचार वाढत असताना गोंधळी हे शांत राहून ज्ञानार्जनाचे कार्य करतात. त्यांच्यात नेहमी काहीतरी वेगळे करण्याची उर्मी असल्याने त्यांनी शिक्षण, राजकारण, कला आणि राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. तसेच त्यांचे त्यांच्या आईवरही अफाट प्रेम आहे, हेच त्यांचे वेगळेपण आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तकांचे लिखाण केले असून, आज प्रकाशित झालेल्या ‘म्हणे एमकेजी’ काव्य संग्रहामध्ये भारतमाता, आई, सोसाटय़ाचा वारा, वृक्ष यासारख्या अनेक कवितांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना सिने दिग्दर्शक चंद्रकांत जोशी म्हणाले, आजच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळत नाही. तंत्रज्ञानाची आवश्यकता असली तरी अती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तरुण भरकटत चालला असून, आत्मविश्वास हरवत चालला आहे. संस्कार लादून होत नाहीत तर ते रूजवावे लागतात.

याप्रसंगी ‘स्वरनिनाद’ प्रस्तुत ‘शब्द सुरांच्या झुल्यावर’ हा गायनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राजेश्वरी गायकवाड व चंद्रशेखर गायकवाड यांनी विविध गाणी सादर केली. तसेच गोंधळी यांचा जीवनपट चित्रफितीव्दारे प्रकाशित करण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रा. जयंत आसगावकर, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, डॉ. संजय पुजारी आदींनी मनोगत व्यक्त केले. तुकाराम कुंभार यांनी प्रास्ताविक केले. सागर बगाडे यांनी मानपत्राचे वाचन केले. शीतल हिरेमठ व किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळाचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पायमल, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार, विनोदकुमार लोहिया, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, दादासाहेब लाड, भरत रसाळे, संभाजी बापट, खंडेराव जगदाळे, सूर्यकांत चव्हाण, राजेंद्र कोरे आदी उपस्थित होते.

Related posts: