|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मिऱयासह अनेक गावांना सागरी अतिक्रमणाचा धोका

मिऱयासह अनेक गावांना सागरी अतिक्रमणाचा धोका 

प्रतिबंधक बंधाऱयाला अनेक भगदाडे

पावसाच्या तोंडावर दुरूस्ती सुरू

शासकीय अनास्थेबद्दल स्थनिकांमध्ये नाराजी

प्रतिनिधी /रत्नागिरी

मिऱया गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या 254 मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत. ऐन पावसाच्या तोंडावर दोन दिवसांपुर्वी बंधाऱयाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होत आहेत. शासनाच्या या अनास्थेमुळे मिऱयासह परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.

मिऱया बंधाऱयाच्या दुरूस्तीसाठी 2016 मध्ये 49 लाखांचा निधी मंजूर झाला. दरवर्षीच्या पावसाळय़ात उधाणाच्या लाटांमुळे बंधाऱयाची हानी होते व त्यानंतर त्याची डागडुजी सुरू होते. मात्र, यंदा डागडुजीच्या काम सुरू करण्यासही खूपच विलंब झाला आहे. सोमवारी जोरदार पाऊस सुरू असतानाच सोमवारी या दुरुस्ती कामाचा नारळ वाढवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत मच्छीमार नेते आप्पा वांदरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठेकेदाराची कार्यपद्धती, शासनाचे धोरण, कामाचा दर्जा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मलमपट्टीला विरोध

13 मे 2018 रोजी या बंधाऱयाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नव्याने दगड न आणता बंधाऱयाच्या पायाचे दगड मोकळे करून आहे तोच बंधारा कमकुवत करण्याचे काम ठेकेदाराने केले. समुद्राच्या पाण्यात कोसळलेले दगड जमा करून त्याद्वारे बंधाऱयाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे या वरवरच्या मलमपट्टीला स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याचे मच्छीमार नेते आप्पा वांदरकर यांनी सांगितले.

पावसाच्या मुहुर्तावर दुरूस्तीचा प्रारंभ

त्यानंतर 13 मे रोजी कंत्राटदाराने येथे मशिनरी आणून ठेवली मात्र कामाला सुरूवात केलीच नाही. स्थानिक गाव गुंडाना हाताशी धरून येथील ग्रामस्थांना दमदाटी करण्याचे काम ठेकेदाराने केले. कामाच्या वेळी ठेकेदार स्वतः किंवा संबंधित अधिकारी याठिकाणी उपस्थित न राहिल्याने पुन्हा ग्रामस्थांनी काम बंद पाडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवलकर, ग्रामस्थ राकेश सनगरे, आप्पा वादंरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाखा अभियंता चौधरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर 18 मे रोजी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत नवीन दगड आणून बंधाऱयाची उंची वाढवण्याची मागणी केल्याचे वांदरकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोमवारी (4 जून 2018) पतन विभागाच्यावतीने या दुरुस्ती कामाचा आरंभ भाटीमिऱया येथे करण्यात आला. पाऊस सुरू झाल्यावर हे काम होणार कसे, दगड आणणार कुठून, असा सवालही वांदरकर यांनी केला.

कायमस्वरूपी तोडगा कधी?

गेल्या अनेक वर्षांपासून मिऱया गावातील सागरी भागाला पावसाळ्यात सागरी लाटांच्या तडाख्याला सामोरे जावे लागते आहे. दगडी धूपप्रतिबंधक बंधाऱयाला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. मिरकरवाडा व भगवती बंदरात उभारण्यात आलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे जमिनीची धूप होण्याची ही समस्या निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. असे असताना पक्का स्वरूपाचा बंधारा बांधण्याकडे संबधितांचे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी कोटय़वधी रुपये या कामावर खर्च केले जात आहेत. या कामातून ठेकेदाराचे पोट भरण्याचा उद्योग सुरू असल्याचे आप्पा वादंरकर पुढे म्हणाले.

दहा ठिकाणी भगदाडे

मिऱया येथील सागरी धूप बंधाऱयाला सुमारे 10 ठिकाणी भगदाडे पडली आहेत. या बंधाऱयाची उंची वाढवण्यासह दुरुस्तीचे 49 लाखांचे काम खेडमधील कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र, त्यानंतर उपठेकेदाराकडे हे काम सोपवण्यात आले आहे. यातील प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मिऱयामध्ये पावसाळ्यात सागराचे पाणी घुसण्याचा धोका कायम आहे असे आप्पा वादंरकर म्हणाले.

अतिक्रमणाचा मोठा धोका

मिऱया गावातील बंधाऱयाला वाडकर, भाटकर, जोशी, वांदरकर यांच्या घराच्या पाठीमागील भागात भगदाडे पडली आहेत. तालुक्यातील काळबादेवी गाव, रत्नागिरी शहरातील मांडवी, मुरुगवाडा व अन्य भागांनाही पावसाळी सागरी लाटांचा, अतिक्रमणाचा मोठा धोका आहे. याबाबत शासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Related posts: