|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » रोनाल्डो पोर्तुगाल संघात दाखल

रोनाल्डो पोर्तुगाल संघात दाखल 

वृत्तसंस्था/ लिस्बन

अवघ्या आठवडाभराच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगाल संघात दाखल झाला. यंदा रशियातील फिफा विश्वचषकात पोर्तुगालची सलामी लढत दि. 15 जून रोजी तुल्यबळ स्पेनविरुद्ध होणार आहे. क्लब स्तरावर रियल माद्रिदकडून खेळणारा रोनाल्डो पोर्तुगालसाठी या विश्वचषकात लक्षवेधी योगदान देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असल्याचे मानले जाते.

पाचवेळा बॅलन ओडोर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या रोनाल्डोने अलीकडेच रियल माद्रिद सोडण्याचे संकेत दिल्याने एकच खळबळ उडाली होती. पण, सध्या तरी अपेक्षेप्रमाणे आपण विश्वचषकावरच लक्ष केंद्रित करुन असल्याचे त्याने येथे आल्यानंतर नमूद केले. रोनाल्डोच्या भवितव्याविषयी बरीच चर्चा सुरु असली तरी संघसहकारी जोआओ मॉटिन्होने त्याच्या खेळावर या चर्चेचा विपरीत परिणाम होणार नाही, असे पत्रकार परिषदेत म्हटले.

‘राष्ट्रीय संघातर्फे खेळत असताना रणनीती कशी असायला हवी आणि आपला विश्वचषकातील गेमप्लॅन काय असेल, यावर आम्ही सखोल चर्चा केली. सध्या आम्हा सर्वांचा त्यावरच भर आहे. त्यामुळे, केवळ एकच खेळाडूची कामगिरी कशी होईल, याचा विचार करण्याची आवश्यकताच नाही’, असे क्लब स्तरावर एएस मोनॅकोचा मिडफिल्डर असलेल्या मॉटिन्होने स्पष्ट केले.

‘रोनाल्डो जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याच्यामुळे आमचा संघ नेहमीच मजबूत रहात आला असून आम्हाला त्याच्यापासून आणखी बरेच काही शिकायचे आहे आणि त्याच्या साथीने संघाला विश्वचषकात नवनवी क्षितिजे काबीज करायची आहेत’, असे मॉटिन्हो पुढे म्हणाला. पोर्तुगालचा संघ आता गुरुवारी लिस्बन येथे अल्जेरियाविरुद्ध मैत्रिपूर्ण सामना खेळणार असून त्यानंतर ते रशियाला रवाना होतील. यापूर्वी मागील दोन मैत्रिपूर्ण सामन्यात पोर्तुगाल त्यांच्या कर्णधाराशिवाय खेळला. त्यात प्रारंभी पोर्तुगालने टय़ुनिशियाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली तर बेल्जियमविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

यंदाच्या विश्वचषकात पोर्तुगालचा संघ ह गटात असून सेनेगल, कोलंबिया व जपान यांच्याविरुद्ध त्यांचे साखळी सामने होणार आहेत.

Related posts: