|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » केएटीच्या इमारतीला जिल्हाधिकाऱयांची भेट

केएटीच्या इमारतीला जिल्हाधिकाऱयांची भेट 

प्रतिनिधी/ बेळगाव

केएटी (कर्नाटक प्रशासकीय लवाद)साठी वकीलांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला यश येवून बेळगावात केएटी स्थापन हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. मात्र अजूनही केएटी सुरु करण्यात आले नाही. अखेर सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील बिम्स् वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर असलेल्या पॅन्टालुम इमारतीमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. त्या ठिकाणी केएटी न्यायालय सुरु करण्यात येणार आहे. याची पाहणी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी केली असून उर्वरित काम तातडीने करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

कर्नाटक प्रशासकीय लवाद बेळगावात स्थापन करावे, यासाठी वकीलांनी तब्बल 23 दिवस काम बंद आंदोलन छेडले होते. या 23 दिवसांमध्ये रास्तारोको, विविध सरकारी कार्यालयांना घेराव, जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव अशा प्रकारे आंदोलन सुरुच ठेवले होते. त्यामुळे सरकारने याची दखल घेत बेळगावला कर्नाटक प्रशासकीय लवाद सुरु करण्यास मान्यता दिली होती. मात्र योग्य जागा मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली होती.

सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील या इमारतीच्या एका मजल्यावर हे न्यायालय सुरु करण्यात येणार आहे. भाडेतत्वावर ही जागा घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांनी यावेळी भेट देवून पाहणी केली आहे. सध्या या इमारतीचे आतील बांधकाम कामकाज सुरु आहे. ते तातडीने पूर्ण करण्याची सूचना आहे. यावेळी प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केएटीच्या चेअरमन यांच्याकडूनही पाहणी

केएटीचे चेअरमन निवृत्त न्यायाधीश भक्तवत्सल यांनी दोन दिवसांपूर्वी याच इमारतीला भेट देवून काम पूर्ण करण्याची सूचना केली होती. महिन्याभरात काम पूर्ण करुन या ठिकाणी केएटी सुरु करण्याची सूचना त्यांनी केली आहे. सध्या केएटीच्या सदस्य नेमण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र एकाही निवृत्त न्यायाधीशांनी अर्ज केला नाही. त्यामुळे पुन्हा अर्ज मागवून त्या ठिकाणी लवकरच केएटी सदस्यांची नियुक्ती करुन कामकाजाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.