|Saturday, March 28, 2020
You are here: Home » क्रिडा » चहावाल्याचे घर, त्याला अर्जेन्टिनाचा साज!

चहावाल्याचे घर, त्याला अर्जेन्टिनाचा साज! 

वृत्तसंस्था/ कोलकाता

शिव शंकर पत्रा हा अर्जेन्टिना व मेस्सीवर अलोट प्रेम करणाऱया कोलकात्यातील हजारो चाहत्यांपैकी एक. यात नवे असे काहीच नाही. पण, या 53 वर्षीय अवलियाने चक्क आपल्या चहा स्टॉल व घरच्या इमारतीलाच अर्जेन्टिनाच्या ध्वजाचा साज चढवत आपले प्रेम अन्य चाहत्यांपेक्षा खूप वेगळे आणि उत्कट असल्याची प्रचिती दिली. वास्तविक, शिव शंकर पत्राला रशियातील विश्वचषक प्रत्यक्ष पाहण्यासाठी थेट रशिया गाठायचे होते. पण, त्याच्या ट्रव्हल एजंटने इतक्या कमी रकमेत वर्ल्ड कप ट्रीप होऊ शकत नसल्याचे सांगितले. (त्या एजंटने) शिवाला दीड लाखाचे बजेट दिले. पण, शिवा इतकी रक्कम जमवू शकत नव्हता. मग त्याने या 60 हजारात आपल्या घरालाच अर्जेन्टिनाच्या ध्वजाचा साज चढवत अनोख्या रितीने आपले स्वप्न साकारले.

‘मी धूम्रपान करत नाही आणि मद्यपानही करत नाही. पण, मला दोनच व्यसने आहेत. त्यातील पहिले व्यसन म्हणजे लायोनेल मेस्सी आणि दुसरे व्यसन म्हणजे अर्जेन्टिना. माझी कमाई फारशी नाही. पण, जितके कमावतो, त्यातील काही वाटा फुटबॉलच्या विश्वचषकादरम्यान खर्च करण्यासाठी वेगळे काढून ठेवतो. अशा बचत रकमेतूनच मी माझ्या घराची रंगरंगोटी केली आहे’. असे तो आपल्या या अनोख्या छंदाबद्दल म्हणतो.

शिव शंकर पत्रा आपल्या तीन मजली घराला केवळ बाहेरुनच रंगरंगोटी करुन थांबलेला नाही तर त्याने आतील सर्व भिंतीना अर्जेन्टिनाच्या ध्वजाचा रंग दिला आहे. याशिवाय, पूजेच्या ठिकाणीही त्याने मेस्सीचे छापील पोस्टर लावलेले आहे. मेस्सीच्या वाढदिवशी येथे केक कापला जातो. शिवाय, रक्तदान शिबिरही घेतले जाते. यंदाही शिव शंकर पत्रा ज्यादिवशी अर्जेन्टिनाचे सामने असतील, त्या दिवशी आपल्या चहा स्टॉलमधून चहा व समोसा मोफत वितरित करणार आहे.

आता केवळ शिवा हा एकटाच मेस्सी व अर्जेन्टिना भक्त आहे, असेही नाही. कारण, त्याची पत्नी स्वप्ना, 20 वर्षांची कन्या नेहा आणि 10 वर्षांचा सुपूत्र शुभम हे देखील मेस्सीचे व त्याच्या संघाचे चाहते आहेत.

माझ्या मुलांनाही मेस्सीबाबत सर्व काही अवगत आहे. त्याचा आवडीचा आहार काय आहे, तो कोणती कार चालवतो, या सर्व बारीक बाबी त्यांना ज्ञात आहेत’, असे शिवा अभिमानाने नमूद करतो. शिवा हनुमानाचा भक्त आहे आणि हनुमानाच्या डाव्या पायातील सिंदूर तो आपल्या भाळी लावून घेतो. डाव्या पायातील सिंदूर लावून घेण्याचे कारण म्हणजे मेस्सी स्वतः डावखुरा आहे. आता या अवलियाचे कोलकात्यातील घर शोधून काढणे तितके अवघड अजिबात नाही. इच्चापोर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर एखाद्या छोटय़ा मुलाला जरी विचारले की, अर्जेन्टिना टी स्टॉल कुठे आहे, तरी त्याचे अगदी बिनचूक उत्तर मिळेल आणि कोणीही सहजपणे या अर्जेन्टिनाच्या भारतातील ‘सेकंड होम’वर सहज जाऊन पोहोचेल!

Related posts: