|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आठशेचे आठ लाख करणारा जाळय़ात

आठशेचे आठ लाख करणारा जाळय़ात 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

धनादेशावर खाडाखोड करून आठशे रुपयांऐवजी 8 लाख 80 हजार रुपये कुडाळ स्टेट बँकेतून जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी गेली चार वर्षे फरारी असलेल्या दीपक सावंत (नारुर, ता. कुडाळ) याला पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई येथे बँकिंग व्यवहारासाठी आला असता सोमवारी त्याला पकडण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विविध गुन्हय़ांविषयी माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील उपस्थित होते.

कुडाळ तालुक्यातील नारुर येथील दीपक दाजी सावंत याने 18 मार्च 2014 रोजी उमिया अर्बन को. ऑपरेटीव्ह बँकेच्या नागपूर शाखेच्या आठशे रुपयांच्या धनादेशामध्ये खाडाखोड करून आठशेंऐवजी 8 लाख 800 रुपये रक्कम टाईप केली व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुडाळ शाखेमध्ये हा धनादेश वटवला. नंतर त्याने आपल्या बँक खात्यात हे 8 लाख 80 हजार जमा करून ही रक्कम वेळोवेळी एटीएम व धनादेशाद्वारे काढली. दरम्यान आठशे रुपयांऐवजी 8 लाख 80 हजार रुपये फसवून काढले गेल्याचे लक्षात आल्यावर बँक अधिकारी अतुलकुमार कच्छप यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार दीपक सावंतसह त्याच्या पाच साथिदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. पाचपैकी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. तर अन्य तिघेजण फरार झाले होते. तपास सुरू असतानाच पाच संशयित आरोपींपैकी एक संशयित आरोपी कोलकत्ता येथे असल्याचे समजले. त्याचा शोध घेण्यासाठी जात असता दीपक सावंत नवी मुंबईमध्ये बँकेत आल्याची खबर मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली व पुढील तपासासाठी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

या फसवणुकीच्या प्रकरणात पोलिसांकडून 18 जूनला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार होते. तत्पूर्वीच एका संशयिताला अटक करण्यात आली. अजूनही दोन संशयित फरार असून त्यांनाही लवकरच अटक करणार असल्याची माहिती गेडाम यांनी दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्यासह हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, पोलीस नाईक अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, सुजाता शिंदे या पथकाने ही कारवाई केली.

Related posts: