|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एअरसेल प्रकरणी कार्तीविरोधात आरोपपत्र

एअरसेल प्रकरणी कार्तीविरोधात आरोपपत्र 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अंमलबजावणी संचालनालयाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांच्या विरोधात आणखी एक आरोपपत्र सादर केले आहे. गाजत असलेल्या एअरसेल-मॅक्सिस घोटाळा प्रकरणात हे आरोपपत्र न्या. ओ. पी. सैनी यांच्या विशेष न्यायालयापुढे बुधवारी ठेवण्यात आले.

चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एअरसेल-मॅक्सिस या कंपनीला लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. या मोबदल्यात कार्ती यांना मोठय़ा रकमेची लाच देण्यात आली होती. तसेच कार्ती यांचा अनेक बनावट कंपन्यांशी संबंध असल्याने या कंपन्यांच्या माध्यमातून पैशाचा गैरव्यवहार केल्याचा व मनी लाँडरिंग करण्यात आहे, असे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे.

चिदंबरम यांनी त्यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात अस्तित्वात असणाऱया विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून सदर कंपनीला विदेशात भांडवल उभे करण्यासाठी अनुमती दिली होती. ती अनुमती बेकायदेशीर आहे, असे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे. चिदंबरम यांना अशी अनुमती देण्याचा अधिकार नव्हता. कारण हा व्यवहार 600 कोटी रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक होता. त्यापेक्षा अधिक मोठा व्यवहार असेल तर आर्थिक विषयातील मंत्रिमंडळ समितीची संमती आवश्यक होती. पण ती घेण्यात आली नव्हती. त्यामुळे चिदंबरम यांच्यावर पदाचा गैरवापर करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांचीही या प्रकरणात आतापर्यंत दोनदा चौकशी करण्यात आली आहे.

मार्च 2006 मध्ये मंडळाने ही अनुमती दिली होती. मात्र ही अनुमती प्रत्यक्षात उतरविताना बरेच फेरफार करण्यात आले. 3 हजार 500 कोटी रूपयांची विदेशी गुंतवणूक केवळ 180 कोटी रुपयांची असल्याचे भासविण्यात आले, असे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे. या प्रकरणात चिदंबरम यांचे पुतणे ए. पलानीअप्पम यांचाही हात असून त्यांच्या कंपनीलाही अवैध लाभ झाला आहे असाही आरोप करण्यात आला आहे.

कार्तीच्या अडचणीत वाढ

नव्या आरोपपत्रामुळे कार्तीच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेषतः बनावट कंपन्यांशी असलेला कथित संबंध सिद्ध करण्यात अंमलबजावणी संचालनालयाला यश आले तर कार्ती कायद्याच्या कचाटय़ात चांगलेच अडकू शकतात, असे कायदेतज्ञांचे मत आहे. चिदंबरम पिता-पुत्राने मात्र सर्व आरोप नाकारले असून राजकीय सूडबुद्धीपोटी कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे.