|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कराटेमध्ये करडय़ाळच्या सुरजला सुवर्णपदक

कराटेमध्ये करडय़ाळच्या सुरजला सुवर्णपदक 

सदाशिव आंबोशे / सेनापती कापशी  

कागल तालुक्यातील करडय़ाळसारख्या छोटय़ा ग्रामीण खेडय़ात कोणतीही सुविधा नसताना आजही सराव करणाऱया सुरज नामदेव बिरंजे या युवकाने कांही तरी वेगळे करुन दाखवण्याच्या तयारीने कराटेसारख्या धाडसी खेळात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चक्क सुवर्ण व रौप्य पदकाची लयलुट केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर चिकोत्रा खोऱयातील या युवकाने तिरंगा अभिमानाने फडकवला. या यशाबद्दल त्याचे आज सर्वत्र कौतुक होत असून  या उदयोन्मुख खेळाडूला जानेवारी 2019 मध्ये मलेशिया येथे होणाऱया मिनी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी त्याचा सराव सुरु आहे.

शाहू साखर  कारखान्याचा मानधनधारक व करडय़ाळ गावचा सुरज बिरंजे हा सर्वसामान्य कुटूंबातील असून वडील शेती करतात. तर त्याची आई गृहिणी आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सुरज बिरंजेने कांही तरी वेगळे करण्याच्या इराद्याने शालेय जीवनापासूनच सुरुवात केली आहे. त्याचा वर्गमित्र संदीप उर्फ विश्वनाथ नांदेकर रा. बेलेवाडी मासा याच्याकडून प्रेरणा घेऊन हे दोन युवक कांही तरी वेगळं करण्याच्या तयारीने खेळामध्ये उतरले आहेत. सेनापती कापशी येथील               श्रीनिवास पुंभार यांचे मार्गदर्शन तर बोटे  इंग्लिश  मिडियम स्कूलमधील क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक संदिप जाधव (रा. हसूर बुद्रूक) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज सराव करीत आहे. सुरजने सुरुवातीला बोटे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सराव केला. त्यानंतर निपाणी येथील विलास नेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वाँदो या साहसी प्रकारात सराव सुरु केला. अल्पावधीतच जिल्हास्तरावर यश मिळवले. त्यानंतर सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही यश मिळवले. यामध्ये त्याला सैन्यात असणारा भाऊ विश्वजीत, वडील नामदेव बिरंजे व आई सौ. अंजना यांचे नेहमी पाठबळ मिळत आहे.

23 ते 29 मे अखेर नेपाळ येथील कांठमांडू येथे 11 वी नुकतीच आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप 2018 ही स्पर्धा पार पडली. नेपाळ ऑलम्पिक समितीच्या ‘नेपाळ शोतोकॉन’  कराटे असोसिएशन  या संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये कतास या प्रकारात गोल्ड मेडल व कुमेती या प्रकारात सिल्वर मेडल सुरजने मिळवले आहे. भारतासह नेपाळ, भुतान, बांगलादेश, श्रीलंका व न्यूझीलंड आदी देशांचा या स्पर्धेत सहभाग होता. सुरजने सेमी फायनलमध्ये नेपाळच्या तर फायनलमध्ये भारताच्याच खेळाडूवर मात करत गोल्डमेडल मिळवले आहे. जानेवारी 2019 मध्ये मलेशिया येथे होणाऱया मिनी ऑलम्पिक स्पर्धेसाठी सुरजची निवड झाली असून तो 71 ते 75 किलो वजनी गटात खेळणार आहे.

गेली दोन वर्षे सुरज या प्रकारात जिल्हा, राज्य व देशपातळीवर खेळत आहे. राष्ट्रीय स्पर्धेत वैजनाथ परळी येथे खेळून आंतरराष्ट्रीय  स्पर्धेत जाण्याची त्याला संधी मिळाली होती.

नेपाळच्या नॅशनल स्पोर्टस् कौन्सिलच्या दशरथ स्टेडियम त्रिपुरेश्वर-कांठमांडू येथील या स्पर्धा भरवल्या होत्या. या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे ज्युदो कराटेचा बादशाह समजला जाणारा ब्रूसली या स्टेडियमवर खेळला आहे. याबरोबरच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्टेडियमवर खेळुन गेले आहेत. अशा नावाजलेल्या स्टेडियमवर सुरजने अत्यंत ग्रामीण भागातून जावून या स्टेडियमवर आपला खेळ दाखवला आहे. ही त्याच्यासाठी एक सुवर्ण संधीच मिळाली. या संधीचे सोने सुरजने केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चक्क सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकाविला.

सुरजच्या या  यशामुळे चिकोत्रा खोऱयात खेळाबाबतची अनास्था दूर झाली आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय बरोबरच आंतरराष्ट्रीय  स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याची परंपरा कायम राखणाऱया सुरजला 2019 मध्ये मलेशिया येथे होणाऱया मिनी ऑलम्पिक सपर्धेत सहभागी होवून भारताला सुवर्णपदक मिळवून द्यावयाचे आहे. यासाठी त्याचा सराव आतापासूनच सुरु झाला आहे. सकाळी उठून व्यायाम, , दररोजची मेहनत निश्चितच त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यात उपयोगी पडेल. अत्यंत आव्हानात्मक अशा कराटेमधील कतास व कुमेती या प्रकारात एक वेगळे विश्व निर्माण करण्याच्या तयारीने सुरज नेहमी धडपडत आहे. या खेळामध्येच आपण करिअर करुन ग्रामीण भागातील युवकांना स्वतःचे आत्मसंरक्षण करता करता देशासाठीही खेळण्याचे धाडस युवकांमध्ये निर्माण करण्याचे त्याचे प्रयत्न आहेत. गावामध्ये मुलांसाठी आयटीकेबीए असोसिएशन मार्फत प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे.

Related posts: