|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » रंगकामगाराच्या लेकीचे यशाचे रंग

रंगकामगाराच्या लेकीचे यशाचे रंग 

वार्ताहर/ कोरेगाव

लोकांच्या घरांच्या भिंतीं रंगवून घरकुलाच्या स्वप्नपूर्तीला रंग देणाऱया रंगकामगाराच्या लेकीने दहावीच्या परीक्षेत अथक परिश्रमाच्या जोरावर 99.80 गुण मिळवित जिह्यात पहिला क्रमांक मिळवला व कष्टकरी आई-वडीलांसाठी स्वप्नवत कामगिरी केली.  फलटण येथील मुधोजी हायस्कुलची विद्यार्थिनी असलेल्या होतकरु अश्विनी गोरख लोणकरने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. शिक्षणाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रातही तिचे प्राविण्य असून मुधोजी हायस्कुलच्या शिरपेचात मानाचे पान वाढवले आहे. तिची परिस्थिती लक्षात घेता मुधोजी हायस्कुलने तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या यशाबद्दल फलटण तालुक्यातून तिचे अभिनंदन होत आहे.

   फलटण तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मुधोजी हायस्कूलने यंदा दहावीच्या परीक्षेत निकालाची गरुडभरारी घेतली. यामध्ये अश्विनी गोरख लोणकर या विद्यार्थिनीने तब्बल 99.80 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला. विद्यालयातच नव्हे तर जिह्यात पहिली येण्याचा मान तिने मिळवला असून माध्यमांपासून तिची यशोगाथा कोसोदूरच राहिली. तिच्या या गुणांपासून मागे असलेले चेहरेच अनेक दिवस सर्व माध्यमांतून झळकले. यामध्ये अश्विनी लोणकरची संघर्षकथा समाजापुढेच आलीच नाही.

   अश्विनीचे वडील गोरख लोणकर हे रंगकामगार आहेत त्यांच्या पत्नी कल्पना या शेतात मजुरीचे काम करतात. या दांपत्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. रंगकाम करीत लोकांची घरे सजवण्यासाठी कष्ट घेणाऱया गोरख लोणकर यांनी त्यांच्या मुलांना शिकवण्याचे स्वन्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी पती-पत्नी दोघांनीही रात्रीचा दिवस करीत कष्ट उपसले. आई-वडीलांचे कष्ट पाहत मोठी झालेल्या अश्विनीने दहावी परीक्षेत यशाचा निर्धार केला, परिस्थितीचा अडथळा मध्ये न आणता जिद्द बांधली व तल्लख बुध्दीमत्तेच्या जोरावर अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. घरची कामे करुन अश्विनीने दहावीच्या अभ्यासाच्या प्रवासात मेहनत घेतली व आई-वडीलांच्या कष्टाचे सार्थक केले.  तिच्यातील बुध्दिमत्तेचे पैलू मुधोजी हायस्कुलचे प्राचार्य रुपनवर व चित्रकला शिक्षक नाळे यांनी हेरले व तिला प्रोत्साहन दिले व वर्षभर तिच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष दिले. शाळेतील सर्वच अध्यापकांनी तिला याबाबतीत विशेष मार्गदर्शन केले. अश्विनीने या सर्वांच्या सहकार्याची यशस्वी परतफेड केली व दहावीच्या परीक्षेत 99.80 टक्के यशा उच्चांकी गुणांचा झेंडा रोवला. अश्विनीने फक्त शिक्षणातच चमक दाखविली असे नाही, तर कला-क्रीडा अशा प्रांतातही तिने वेळोवेळी आपले वेगळेपण सिध्द केले आहे. कराटे आणि किक बॉक्सिंगची तिला आवड असून शालेय किक बॉक्सिंगमध्ये तिने राज्यस्तरावर उपविजेती होण्याची कामगिरी करीत रौप्यपदक मिळवले आहे. तसेच कराटेमध्येही ब्लॅक बेल्ट संपादन केला आहे.  यासाठी कलाशिक्षक नाळे हे पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. याशिवाय चित्रकलेचा वडीलांचा वारसाही तिने जपला आहे. एलिमेंटरी व इंटरमिजट अशा दोन्ही शासकीय रेखाकला परीक्षा ती चांगल्या ग्रेडने उतीर्ण झाली आहे. एकूणच अश्विनीने परिस्थितीवर आपल्या जिद्दीने मात करत आई-वडीलांच्या कष्टाला यशाची मोठी पोहोचपावती दिली असून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. वडील गोरख लोणकर आपल्या लेकीविषयी अभिमानाने सांगत असून लेकीने मोठय़ा हिकमतीने दहावी परीक्षेत उत्तुंग मिळवले आहे. याचा मनस्वी आनंद झाला आहे, कष्टाचे फळ मिळाले आहे. यापुढेही तिच्यासाठी परिश्रम करु, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिली.