|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » मंगेश देसाई यांचे छोटय़ा पडद्यावर आगमन

मंगेश देसाई यांचे छोटय़ा पडद्यावर आगमन 

  ‘नवे पर्व युवा सर्व’ हे ब्रीद वाक्य घेऊन झी युवा या वाहिनीने नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम मालिका आणल्या आणि प्रेक्षकांनी त्या मालिकांना मनापासून पसंती सुद्धा दिली. या मालिकांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळय़ा छटा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाल्या. झी युवा या वाहिनीने अहमदनगर मध्ये राहणाऱया पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट ‘कट्टी बट्टी’ प्रेक्षकांच्या भेटीस आणली आणि प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रेम दिले. या मालिकेत अभिनेता पुष्कर सरद पराग नावाच्या एका प्राध्यापकाची भूमिका सादर करत असून अभिनेत्री अश्विनी कासार ही पूर्वा नावाच्या शिक्षणाला प्राधान्य देणाऱया मुलीची भूमिका साकारत आहे.

  नुकतेच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिले की पूर्वा आणि परागचे लग्न मोडले कारण पूर्वाला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. जेव्हा पूर्वाचा गोंधळ उडतो आणि तिला मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा ती तिला पीएचडीसाठी मार्गदर्शन करत असलेल्या पाठारे सरांकडून मार्गदर्शन घेते. या मालिकेत पठारे सरांची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता मंगेश देसाई साकारत आहे. मंगेश देसाई यांनी बऱयाच काळानंतर छोटय़ा पडद्यावर पुनरागमन केले आहे. त्यांची भूमिकाही तितकीच सशक्त आहे. पूर्वा बोराडेचे हे पीएचडीचे सर, धनंजय पाठारे म्हणजे नगरमधील एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्व शिस्तप्रिय, वेळेला महत्व देणारे आणि शिक्षणाला प्राधान्य देणाऱया पाठारे सरांचे मार्गदर्शन म्हणजे पूर्वासाठी सुवर्णसंधीच. पूर्वला पीएचडीसोबतच आयुष्यात समोर येणाऱया संकटांना कसे सामोरे जायचे याचेदेखील मार्गदर्शन करत असतात. पाठारे सरांचे मार्गदर्शन म्हणजे हाताला धरून शिकवणे नव्हे तर आयुष्यात आलेल्या अनुभवांतून समोरच्याला शहाणे करणे. पूर्वेच्या आयुष्यात अचानक आलेला लग्नाचा विषय, तिची द्विधा मनस्थिती आणि लग्न व पीएचडी यामध्ये तिची उडालेली तारांबळ या सगळय़ात तिला कठोर शब्दात पण योग्य ते मार्गदर्शन करणारे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणजे पाठारे सर. ही व्यक्तिरेखा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.