|Sunday, December 8, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सब मिले हुए हैं जी

सब मिले हुए हैं जी 

पावसाळय़ात आपली एक जीवघेणी गंमत नेहमी होत असते. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी काही पिशव्या वगैरे घेऊन स्कूटरवरून निघालो की पावसाचे कोवळे थेंब पडायला सुरुवात होते आणि आपण घाबरतो. पिशव्या खराब होतील, रस्तोरस्ती असलेल्या अजरामर खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी पडले की त्यांची जलयुक्त मिनीशिवारे होतील. त्यातून स्कूटर नेणे दुरापास्त होईल. असे विचार करून आपण स्कूटर बंद करून बाजूला लावतो आणि दिसेल त्या रिक्षाचालकाला हात करून मुश्किलीने लाभलेल्या रिक्षात बसतो. रिक्षा सुरू होते आणि आकाशातले खटय़ाळ ढग पांगून पाऊस थांबतो. ऊन पडते.

कधी कधी याच्या उलट होते. म्हणजे आपण स्कूटर तशीच रेटून कामाला गेलो तर काही क्षणातच धो धो पाऊस कोसळतो. अंगावरचे कपडे, जवळच्या पिशव्या भिजतात. मोबाईलला पाणी लागू नये, जवळची कागदपत्रे खराब होऊ नयेत म्हणून आपल्याला घाईघाईने स्कूटर रस्त्याच्या कडेला नेऊन कुठेतरी आसरा घ्यावा लागतो.

पावसाळय़ात ओला कॅब बुक करायला लागलो तर त्यांना कुठेतरी ढग दिसतात आणि ते लोक भाडय़ाची रक्कम वाढवतात. कधी कधी आपण मुसळधार पावसात भिजत असतो आणि त्यांना ते समजत नाही, तस्मात आपल्याला ओला कॅब स्वस्तात लाभते.  पावसाळय़ात रेनकोट घेऊन फिरले तर पाऊस नसेल तेव्हा रेनकोटचे ओझे होते आणि पावसात रेनकोट परिधान केला तर रेनकोटच्या बाहेरच्या बाजूला पावसाच्या धारा आणि आतल्या बाजूला घामाच्या धारा वाहतात.

पावसाळय़ात कधी कधी ढग नुसते गडगडाट करतात. पण पाऊस पडत नाही. शेतकरी व्याकूळ होतात. मनपावाले नागरिकांना बचतीचे सल्ले देतात. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा झाला की टॅन्कर माफियांच्या तोंडाला पाणी सुटते. काही काही पुढारी कसे स्वतःच्याच मित्रपक्षाच्या सरकारला रोज शिव्या देतात आणि सत्तेतून बाहेर काही पडत नाहीत.

ढग नुसते गडगडाट करतात आणि म्हणतात, गडगडाट करून दाखवला. पुढारी लोक नालेसफाईची कामे करून दाखवली असं म्हणतात पण एक पाऊस पडला की वरुण राजा म्हणतो, शहर पाण्यात तुंबवून दाखवलं.

दिल्लीसारख्या शहरात ढग नुसते जमतात, कामचुकार सरकारी बाबूंसारखे टाईमपास करतात आणि पाऊस अडवून ठेवतात. काही काही देशात आयएएस अधिकारी कामावर येतात पण कोणाच्या तरी फूस लावण्यावरून फायली अडवून ठेवतात. केजरीवालसाहेबांचा लोकप्रिय डायलॉग आठवतो, सब मिले हुए हैं जी.

Related posts: