|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात 

प्रतिनिधी /पणजी :

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयमवर आयोजित करण्यात आला होता. तिसवाडी तालुक्यातील विविध शाळांतील मुले आणि त्यांचे शिक्षक तसेच इतर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राज्यपाल मृदुला सिन्हा या प्रमुख पाहुण्या तर मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आरोग्य सेवा संचालनालय तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांच्याहस्ते तसेच मुख्य सचिव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समई प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शालेय मुलांनी विविध योगासने केली. श्रीमती सिन्हा तसेच श्री. शर्मा यांनी मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व मुलांना सांगितले.

विद्यार्थी, शिक्षक, अधिकाऱयांचा समावेश

सकाळी 7 ते 9 या वेळेत हा कार्यक्रम झाला. तिसवाडी तालुक्यातील बहुतेक शाळांमधील मुलांनी त्यात भाग घेतला. मुलांच्या सोयीसाठी बालरथ वाहनांचा वापर करण्यात आला. आरोग्य खाते संचालक संजीव दळवी तसेच क्रीडा – युवा व्यवहार खाते संचालक व्हि. एम. प्रभुदेसाई तसेच आरोग्य खाते सचिव अशोक कुमार व इतर अधिकारी त्यावेळी हजर होते.

राज्यातील सर्व तालुक्यातून योगदिनाचे कार्यक्रम सरकारी पातळीवर आयोजित करण्यात आले होते. तिसवाडीसह सर्व 12 तालुक्यात मिळून 12 ठिकाणी योगदिनाचे कार्यक्रम झाले. त्यात तालुक्यातील विविध शाळेची मुले सहभागी झाली. तेथे त्यांनी योगासने केली तसेच मान्यवरांचे मार्गदर्शनही त्यांना लाभले. त्याशिवाय विविध शाळांनी, संस्था – संघटना तसेच एनजीओतर्फे योगादिनाचे विविध कार्यक्रम आखले होते. त्याच शिक्षकांनी तसेच नागरिकांनी सहभागी होऊन योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.