|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचरा येथे विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान

आचरा येथे विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान 

वार्ताहर / आचरा:

आचरा वरचीवाडी येथील संस्थेच्या इमारतीवर स्लॅब घालण्यासाठी शनिवारी रात्री खासगी ठेकेदार पेन उभी करीत असताना लगत असलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या वर पडल्याने निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या विद्युत पुरवठय़ामुळे वरचीवाडी भागातील अनेक ग्रामस्थांची विद्युत उपकरणे जळून लाखेंचे नुकसान झाले. रस्त्यालगत झालेल्या या घटनेमुळे वाहतूकीस धोका निर्माण झाला होता. याबाबत तातडीने वीजपुरवठा बंद केल्याने अनर्थ टळला मात्र संतापलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला फैलावर घेतले. शेवटी झालेली नुकसान भरपाई भरून देण्याच्या अटीवर यावर तोडगा काढला गेला.

शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आचरा-मालवण रोडवर असलेल्या संस्थेच्या इमारतीवर रविवारी स्लॅब टाकण्याची पूर्वतयारी म्हणून ठेकेदाराकडून रात्री पेन उभी केली जात होती. या इमारती लगतच विद्युत मंडळाचे जनित्र असून यावरून आचरा तिठय़ाचा काही भाग तसेच समर्थ नगर परिसराला वीजपुरवठा केला जातो. ही पेन या जनित्रालगतच्या तारांवर पडल्याने निर्माण झालेला उच्च विद्युत पुरवठा तारांमधून जाऊन या भागातील अनेक लोकांची विद्युत उपकरणे जळून लाखेंचे नुकसान झाले. यात टीव्ही, फ्रिज, इनव्हर्टर लाईट फिटिंग, बल्ब जळून गेले. ही पेन तारांवर पडल्याने मोठा आवाज झाल्याने लगतच असलेले दीपक आचरेकर, लिलाधर पाटकर, रुपेश हडकर, गौरव पेडणेकर, जुवेकर, छोटू पांगे आदींनी धाव घेत रस्त्याने जाणाऱया वाहनचालकांना थांबवित वीज कंपनीला याची कल्पना देऊन वीजपुरवठा खंडित केला गेला. या घटनेमुळे आपले नुकसान झाल्याचे कळताच समर्थ नगरच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदाराला फैलावर घेतले. घटनेची माहिती मिळताच, तेथे आलेले माजी सरपंच मंगेश टेमकर यांनी मध्यस्थी करीत ठेकेदाराला झालेली नुकसान भरपाई भरून देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी तोडगा मान्य करीत झालेल्या नुकसानीची पाहणी ठेकेदाराने करण्याचे ठरले आणि वाद मिटला.

Related posts: