|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सत्तरीतील धबधबे प्रवाहित न झाल्याने पर्यटकांचा हिरमोड

सत्तरीतील धबधबे प्रवाहित न झाल्याने पर्यटकांचा हिरमोड 

प्रतिनिधी/ वाळपई

सत्तरी तालुक्यातील चरावणे, हिवरे, पाल या गावांमधील पावसाळय़ात ओसंडून वाहणारे धबधबे जून महिना संपत आला तरी अजून प्रवाहित झाले नसल्याने निसर्ग पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. रविवारी मडगाव, पणजी व अन्य भागातून काही पर्यटक येथील धबधब्यांवर निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले होते, मात्र सत्तरी तालुक्यातील विविध ठिकाणचे धबधबे पूर्ण क्षमतेने अद्याप प्रवाहित न झाल्याने त्यांचा अपेक्षाभंगच झाला.

पावसाळी मोसमात प्रवाहित होणाऱया सत्तरी तालुक्यातील विविध ठिकाणच्या धबधब्यांमुळे जून ते सप्टेंबरपर्यंत मोठय़ा प्रमाणात पर्यटक या भागात दाखल होत असतात. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी तर या धबधब्यांवर पर्यटकांची जत्रा होते. यानिमित्ताने निसर्गप्रेमीही निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दाखल होत असतात. यंदा 8 जूनला मान्सूनने गोव्यात हजेरी लावली खरी, मात्र त्यानंतर काही दिवस मान्सून गायब झाल्यामुळे हे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होऊ शकले नाहीत. जून महिन्यातील तीन आठवडे संपत आले तरी हे धबधबे प्रवाहित न झाल्याने आनंद लुटण्यासाठी येणाऱया पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

चरावणे व हिवरे हे गाव वाळपईपासून 12 किलोमीटर अंतरावर जंगल भागात आहे. येथील निसर्ग संपन्नतेने बहरलेला परिसर पर्यटकांना खुणावत असतो. पावसाळय़ात डोंगर कपारितून प्रवाहित होणाऱया धबधब्यांमुळे या भागाचे सौंदर्य अधिक खुलून येते. या निसर्ग आविष्काराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी या भागात होते. काही हौशी पर्यटकही दाखल होत असतात व त्यांच्याकडून मद्यप्राशन व धांगडधिंगा घालण्यासारखे प्रकारही होतात. या भागातील ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठविल्यामुळे धबधब्यांच्या ठिकाणी होणारे गैरप्रकार काहीप्रमाणात कमी झाले आहे. पोलीस खाते व अबकारी खात्यामार्फत या भागात दाखल होणाऱया पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यात येत असल्यानेही गैरप्रकारांना आळा बसला आहे.