|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केरळच्या चर्चमध्ये सेक्स स्कँडल, 5 पाद्री निलंबित, चौकशी सुरू

केरळच्या चर्चमध्ये सेक्स स्कँडल, 5 पाद्री निलंबित, चौकशी सुरू 

पापक्षालनासाठीच्या कबुलीचा पाद्रींकडून गैरवापर

वृत्तसंस्था/ कोट्टायम

केरळच्या कोट्टायम शहरातील चर्चमध्ये सेक्स स्कँडल घडल्याचे उघडकीस आल्यावर 5 पाद्रींना निलंबित करण्यात आले आहे. चर्चमधील या सेक्स स्कँडलमुळे संपूर्ण केरळ हादरून गेले आहे.

मलंकरा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चने या पाच पाद्रींना निलंबित केले आहे. येशू ख्रिस्तासमोर पापक्षालनासाठी आलेल्या महिलेवर या पाद्रींनी लैंगिक अत्याचार केले. या महिलेने पापक्षालनासाठी दिलेल्या कबुलीचा या पाद्रींनी तिला ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला होता. याप्रकरणी चर्चने अंतर्गत चौकशी चालविली आहे. याचा अहवाल आल्यानंतर कारवाई होईल, असा दावा चर्चचे जनसंपर्क अधिकारी पी.सी. इलियास यांनी केला.

समाजमाध्यमांवर अनेक गोष्टी प्रसारित होत आहेत, त्यात काही तक्रारींचाही समावेश आहे. आम्ही केवळ चौकशी अहवालाची वाट पाहतोय असे इलियास यांनी म्हटले.

निरानाम धर्म प्रांताच्या अध्यक्षांकडे 7 मे रोजीच तक्रार केली होती, परंतु चर्च आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. तर दोषी पाद्रींच्या विरोधात सज्जड पुरावे असल्याचा दावा पीडितेने केला. तीन पाद्री निरानाम धर्म प्रांतातील तर एक दिल्ली तसेच एक थुमपामोन धर्मप्रांताचा असल्याचे तिने सांगितले.

केरळमध्ये मागील काही दिवसांपासून एक ध्वनिफित प्रसारित होत असून याद्वारे महिलेच्या पतीने पूर्ण घटनेची माहिती मांडली आहे. आरोपींपैकी एका पाद्रीने विवाहापूर्वीच आपल्या पत्नीचे लैंगिक शोषण केले, विवाहानंतर देखील पाद्रीने माझ्या पत्नीवर अत्याचार केल्याचे संबंधित व्यक्तीने म्हटले आहे.