|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जुने गोवे जेटीचे 16 कोटी पाण्यात

जुने गोवे जेटीचे 16 कोटी पाण्यात 

प्रतिनिधी/ पणजी

राज्य साधन-सुविधा विकास महामंडळामार्फत जुने गोवे येथे बांधण्यात आलेल्या फ्लोटिंग जेटीची दुर्दशा झाली असून  16 कोटी रुपये पाण्यात गेल्यात जमा आहे. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत दुर्दशा झाली आहे. सरकारी निधीचा हा चुराडा कुणाच्या हितासाठी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मे 2018 पर्यंत ही जेटी बंदर कप्तान खात्याच्या ताब्यात द्यायला हवी होती. मात्र उद्घाटनानंतरच्या अवघ्या कालावधीत जेटीची दुर्दशा झाली आहे.

एम. वेंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट लि. या कंत्राटदार कंपनीने या प्रकल्पाचे काम केले आहे. 14 डिसेंबर 2016 रोजी मोठय़ा थाटात या जेटीचे उद्घाटन करण्यात आले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याहस्ते या जेटीचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी विद्यमान सभापती प्रमोद सावंत हे साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष होते तर माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर हे उपाध्यक्ष होते. माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व तत्कालीन आमदार पांडुरंग मडकईकर व अन्य अधिकाऱयांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

मोठय़ा उत्साहात या जेटीचे उद्घाटन झाले खरे मात्र ही जेटी उद्घाटनानंतर दीड वर्ष उलटले तरी बंदर कप्तान खात्याच्या ताब्यात आलेली नाही. कारण या जेटीवरील टाईल्स उखडले गेले आहेत. काही ठिकाणी क्रॉक्रिटही उखडलेले आहे. त्याचबरोबर स्टील टेलिंगला बोटीची धडक बसल्याने त्यालाही बाधा पोचली आहे. आज या जेटीची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे पुन्हा काम करून ही जेटी ताब्यात द्यावी, अशी सूचना आता बंदर कप्तान खात्याने केली आहे.

हल्लीच बंदर कप्तान, साधन-सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी व कंत्राटदार यांची हल्लीच बैठक झाली होती. आता लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी सूचना कंत्राटदाराला करण्यात आली आहे.

दीड वर्षातच जेटीची दुर्दशा झाली

वेगळ्या पद्धतीने ही जेटी बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली होती. कंत्राटदार कंपनीने 2016 मध्ये काम पूर्ण केले व डिसेंबर 2016 मध्ये या जेटीचे उद्घाटन झाले. मात्र अवघ्याच कालावधीत या जेटीची दुर्दशा कशी झाली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या कंत्राटदार कंपनीने या जेटीचे काम केले त्या कंपनीकडे गोव्यातील महत्त्वाचे आणि कोटय़वधी रुपये खर्चाचे अनेक प्रकल्प आहेत. महामार्ग रुंदीकरणाचे मोठे कंत्राट याच कंपनीला मिळाले आहे. पेडणेचे बसस्थानक, मिरामार रस्ता, आयटी हब इमारत पणजी सरकारी महाविद्यालय केपे, दाबोळीचा ग्रेड सेपरेशन प्रकल्प आदी मात्र कंपनीकडे आहेत. अशी माहिती साधन-सुविधा महामंडळाकडूनच देण्यात आली.

 अवघ्या महिन्यात नवीन जेटीची दुर्दशा झाल्याने आता साधन-सुविधा विकास महामंडळ व बंदर कप्तान खात्यानेही हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. मात्र कंत्राटदार कंपनीने सध्या सल्लागारावर ठपका ठेवला आहे. सल्लगाराच्या चुकीच्या सल्ल्यामुळेच जेटीची अवस्था अशी झाली आहे. मध्यंतरी ही जेटी एका खाजगी व्यावसायिकाला बोट लावण्यासाठीही दिली होती, अशी चर्चा आहे. एका माजी मंत्र्याने या व्यावसायिकाला जेटी वापरण्याचा सल्ला दिला होता. आणि त्यामुळे या जेटीला बोटीची धडक बसली व रेलींगचे नुकसान झाले.

जीएसआयडीसीच्या कामाबाबत सतत तक्रारी

राज्य साधन-सुविधा विकास महामंडळाच्या कामाबाबत तक्रारी असतात. त्याचबरोबर जीएसआयडीसीमार्फत केली जाणारी कामे ही खर्चाच्या बाबतीत मोठी असतात असा आरोप याअगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला होता. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केल्या जाणाऱया कामाच्या बाबतीत जीएसआयडीसीची कामे डबल खर्चाची असतात असे ढवळीकर यांनी जाहिरपणे सांगितले होते. मिरामार रस्त्याचे भीजत घेंगडे तर दीर्घकाळ राहिले. कुंभारजुवा गंवडाळी पुलाच्या बाबतीतही जीएसआयडीसीवर आरोप करण्यात आले होते. मध्यंतरी दीड महिन्यासाठी हा पूल बंदही ठेवण्यात आला होता.

Related posts: