|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिव-पार्वती संवाद

शिव-पार्वती संवाद 

केका मेकां कुरु पशुपतिः नैव दृश्ये विषाणे ।

स्थाणुर्मुग्धे न वदतितेरूः जीवितेशः शिवायाः

गच्छाटव्यामिति गिरिजया निर्जितश्चन्द चूडः।।

 

अन्वय-

‘कःत्वम्?’ (अहं) शूली’ ‘(तर्हि) भिषजं मृगय’

‘प्रिये अहं नीलकण्ठः’ ‘एकां केकां कुरु’ ‘(अहं)

पशुपतिः’ ‘तव विषाणे नैव दृश्ये मुग्धे अहं स्थाणुः (अस्मि) तरुः न वदति अहं शिवायाः जीवितेशः अस्मि’ ‘(तर्हि अटव्यांगच्छ)

इति (प्रत्युत्तरैः) गिरिजया चन्दचूडः निर्जितः

 

अनुवाद : ‘तू कोण आहेस?’ ‘मी शूली आहे’ ‘(कपाळ) शूळ (होतोय) तर वैद्याला शोध’ ‘अग प्रिये, मी नीळकंठ आहे’ ‘नीळकंठ (म्हणजे मोर) तर मग एक केका (टणे) कर पाहू’ ‘(अग) मी पशुपती’ ‘पशुपती (बैल) आहेत तर शिंगे दिसत नाहीत ती, ‘अगं मी स्थाणू आहे’ ‘स्थाणू (वृक्ष) असशील तर वृक्ष बोलत नाही! ‘मी शिवेचा (उमेचा) जीवितस्वामी आहे’ ‘शिवेचा (कोल्हीचा) स्वामी तर मग अरण्यात जा बरं’ अशा प्रकारे (चातुर्यपूर्ण प्रत्युत्तरे देऊन निरुत्तर करून) पार्वतीने शिवावर विजय मिळविला.

 

विवेचन : या विनोदी सुभाषितात शंकर पार्वतीचा संवाद कल्पिलेला आहे आणि रात्री घरी येऊन आपली ओळख पटविण्याचा प्रयत्न करणाऱया शंकराच्या बोलण्याचा वेगळाच अर्थ घेऊन त्याची फिरकी घेऊन त्याला निरूत्तर करणारी चतुर पार्वती आपणास दिसते.

‘शूली’ याचा अर्थ त्रिशूळधारी शंकर असा आहे. पण पार्वती मुद्दामच ‘कपाळशूळाने त्रस्त’ असा घेऊन वैद्याकडे जाण्याचा सल्ला देते. नीळकंठ म्हणजे शिव, पण ‘मोर’ असाही अर्थ होतो तो घेऊन केका कर म्हणते. ‘पशुपती हे शंकराचे विशेषण पण त्याचा बैल असा अर्थ घेऊन ‘शिंगे कुठे आहेत’ असे विचारते.

स्थाणू हे शंकराचे नाव. पण त्याचा दुसरा अर्थ ‘वृक्ष’ असा घेऊन ‘वृक्ष बोलत नाही’ असे उत्तर पार्वती देते. शेवटी शंकर तिच्या भावनेलाच हात घालून ‘शिवेचा (म्हणजे पार्वतीचा) जीवितेश्वर असल्याचे सांगतो. पण इथेही पार्वती ‘शिवा’चा अर्थ कोल्ही असा घेऊन (कोल्हा असशील) तर अरण्यात जा’ असे सुनावते. अशा रीतीने चतुराईने निरुत्तर करून पार्वती शंकरावर विजय मिळवते आणि या चतुर संवादामुळे आपलेही मनोरंजन होते.