|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाकिस्तानसाठी सरसावला चीन

पाकिस्तानसाठी सरसावला चीन 

एफएटीएफच्या देखरेख यादीत पाकिस्तान

वृत्तसंस्था/ बीजिंग

 दहशतवादी गटांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यास अपयशी ठरलेल्या पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्याच्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) निर्णयाचे भारत आणि अमेरिकेने स्वागत केले. तर आंतरराष्ट्रीय वर्तुळात एकाकी पडलेल्या पाकच्या मदतीसाठी चीन सरसावला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर विश्वास ठेवावा असे म्हणत चीनने दहशतवादविरोधी मोहिमेकरता त्याचे कौतुक देखील केले.

पाकने दहशतवादविरोधी लढाईसाठी अनेक पावले उचलली असून त्याला त्याग देखील करावा लागला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकच्या या प्रयत्नांना मान्यता देणे गरजेचे असल्याचे चीनने म्हटले. 37 सदस्यीय एफएटीएफने बुधवारी पाकिस्तानला देखरेख यादीत टाकले होते. यादीत सामील होणारा पाक नववा देश आहे.

दहशतवादाला होत असलेला वित्तपुरवठा आणि मनी लॉन्ड्रिंग रोखण्यास अपयशी ठरलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था जगाच्या वित्तीय संस्थेला धोक्यात आणू शकते असे एफएटीएफने म्हटले आहे.

दहशतवादविरोधात लढून पाकने चीनसोबतच जगाच्या अनेक देशांचा विश्वास संपादित केला आहे. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी पाकिस्तान सर्व आवश्यक पावले सक्रीयपणे उचलत आल्याचा दावा चीनच्या विदेश मंत्रालयाने केला.

पाकिस्तानात पोसल्या जाणाऱया दहशतवादाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जाणारी चिंता दूर करण्यासाठी शेजारी देश काही विश्वासार्ह पावले उचलेल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.

Related posts: