|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोमवारपर्यंत महामार्ग खुला करण्याचे प्रयत्न

सोमवारपर्यंत महामार्ग खुला करण्याचे प्रयत्न 

प्रतिनिधी / फोंडा

खांडेपार येथे सुरु असलेल्या गोवा-बेळगाव महामार्गाच्या कामाची दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी शनिवारी पाहणी केली. डोंगरकडा कापण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवारपासून हा मार्ग दुचाक्या व हलक्या वाहनांसाठी सुरु केला जाईल. काही प्रमाणात प्रवासी बस वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली.

केरिया-खांडेपार येथे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. गेल्या आठवडय़ात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने हा रस्ता 25 जूनपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात दिल्लीला असलेले खासदार सावईकर हे शनिवारी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी खांडेपार येथे जाऊन कामाची पाहणी केली. बांधकाम खात्याचे अभियंते व कंत्राटदाराशी चर्चा केली. आठवडाभर महामार्ग बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे डोंगरकडा हटविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी आपण बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी बोलणी केल्याचे खासदार सावईकर यांनी सांगितले. सध्या हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून सोमवारपासून रस्ता खुला करण्याचे प्रयत्न आहेत. भू-संपादनाच्या प्रक्रियेविषयीही त्यांनी अभियंते श्री. कामत यांच्याशी चर्चा केली. यावेळी फोंडय़ाचे उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, नगरसेवक शांताराम कोलवेकर, व्यंकटेश उर्फ दादा नाईक, कुर्टी खांडेपारच्या सरपंच रुक्मा खांडेपारकर, माजी सरपंच संदीप खांडेपारकर, भाजपाचे दिगंबर जल्मी आदी उपस्थित होते.