|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘सरोवर गाते आहे’ मधील कविता माणुसकी जागृत करणाऱया

‘सरोवर गाते आहे’ मधील कविता माणुसकी जागृत करणाऱया 

प्रतिनिधी/ पणजी

कविता ही कवीला ऐकवणे कधीही चांगलेच! आज प्रकाशन झालेल्या कवितेच्या पुस्तकातील काही कविता या गझलाच्या अंगाने गेल्या आहेत. आपण एक गझलकार आहे व गझलकारांना कविता येत नाही हा गैरसमज काही गझलकारांनीच पसरविला आहे असे सांगून हे चूक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. ‘सरोवर गाते आहे’ कवितासंग्रहातील कविता या माणुसकी जागृत करणाऱया आहेत असे उद्गार पुणे येथील सुप्रसिद्ध गझलकार प्रदीप निफ्ढाडकर यांनी काढले.

दिलीपराज प्रकाशन, गोवा मराठी अकादमी आणि इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझा आयोजित अंजली चितळे यांच्या ‘सरोवर गाते आहे’ या कविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मालवण येथील लेखिका, कवयित्री वैशाली पंडित, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर आणि कवयित्री अंजली चितळे यांची उपस्थिती होती.

यावेळी वैशाली पंडित यांनी सांगितले की, आपण कवयित्री नाही पण चांगली रसिक आहे. जो तो आपली तीच कविता आहे असे सांगत असतो. जी आपल्याला आत भीडते ती कविता असते अशी आपली भूमिका कवितांबद्दल आहे. काही कविता या रसिकाला कळतच नाही त्यावेळी रसिकाला वाटतं की ही कविता आपल्या अवाक्यातली नाही, ही कविता लिहिणारा थोर असेल वगैरे. कविता ही स्वतःचा शोध घेणारी असली पाहिजे.

अंजली चितळे यांनी आपल्या पुस्तकाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, आपल्यामध्ये लिहिण्याचे बीज हे असते व मिळालेल्या अनुभवातून ते शाब्दीक स्वरुपात प्रकट होतात. आपल्याला सहजपणे कविता लिहाव्या अशा वाअल्या व आपण लिहिले. आपल्याला बरेच जण आपल्या प्रेरणेबद्दल विचारत असतात तर त्यांना उद्देशून त्यांनी यावेळी सांगितले की आपली खरी प्रेरणा म्हणजे निसर्ग आहे.

याप्रसंगी संजय हरमलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रा. अनिल सामंत यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कवितेतील काही निवडक कवितांना अंजली चितळे यांनी चाल लावली असून त्याचे सादरीकरणही यावेळी झाले. ईशा घाटे, श्रृंखला जोशी आणि आकांक्षा प्रभू यांनी यावेळी कविता सादर केल्या.