|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तौफिक आणि आरिफ शेख बंधूंना कुरवाळण्याचे सुशीलकुमारांचे प्रयत्न

तौफिक आणि आरिफ शेख बंधूंना कुरवाळण्याचे सुशीलकुमारांचे प्रयत्न 

शिवाजी भोसले/ सोलापूर

आपली राजकीय वारसदार कन्या आ. प्रणिती शिंदे यांची आगामी आमदारकीची वाट सुकर करण्यासाठी पिता-माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आतापासूनच प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी त्यांनी शहरमध्य मतदारसंघात गोळाबेरजेच्या राजकारणाच्या सोंगटय़ा पडद्याआडून टाकण्यास सुरुवात केली आहे. कन्या प्रणितींसाठी या मतदारसंघात आव्हान ठरणाऱया एमआयएम पर्यायाने तौफिक शेख यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे यांनी प्रयत्न चालवल्याची माहिती त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांकडून दैनिक ‘तरुण भारत संवाद’ला मिळाली आहे. तौफिक शेख आणि त्यांचे बंधू माजी महापौर आरिफ शेख या जोडगोळीचे योगदान मध्य मतदारसंघात मिळाल्यास येथील एमआयएमची ताकद खालसा होण्याबरोबरच प्रणिती शिंदे यांच्या आमदारकीच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो. हे ओळखून तौफिक यांच्याबरोबरच बंधू आरिफ शेख यांनाही आपल्याबाजूने ‘दिल से’ ओढण्याच्या हालचाली शिंदे यांच्याकडून झाल्या आहेत.

तथापि तौफिक शेख यांनी एमआयएमचा ‘पतंग’ हवेत सोडून काँग्रेसचा ‘हात’ धरण्यासंदर्भात सुशीलकुमारांना अभिवचन दिले का ? तसेच आरिफ शेख यांनी मनापासून काँग्रेसचे त्यातही प्रणिती शिंदे यांचे काम करण्याबद्दल शब्द दिला का? या संदर्भातील तपशिल मात्र सांगण्यास निकटवर्तीयाने टाळले. उपरोक्त प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ‘वेट ऍन्ड वॉच’ ही भूमिका काही दिवस बजावा, असेही निकटवर्तीय म्हणाले.

आपली राजकीय वारसदार कन्या प्रणिती यांना सन 2014 ची विधानसभा खुप जड गेली. यावेळी निसटता विजय मिळाला. शहरमध्य मतदारसंघात एमआयएमच्या धर्मांधतेची बिजे पेरुन तौफिक शेख यांनी प्रणिती शिंदे यांच्या आमदारकीची वाट खूपच अडचणीची केली होती. निवडूण येताना शिंदे परिवाराची पुरती दमछाक झाली होती. इतर विरोधी उमेदवारांपेक्षा एमआयएम म्हणजेच तौफिक शेख यांचे कडवे आव्हान प्रणितींना भारी पडले होते.

दरम्यान आगामी आमदारकीची निवडणूक लक्षात घेता, प्रणिती या प्रतिनिधीत्व करत असलेल्या शहर मध्य मतदारसंघावर सुशीलकुमारांनी आतापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. या खेपेची निवडणूक सहजपणे जिंकता यावी, यासाठी त्यांनी आतापासूनच सोंगटय़ा टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमआयएम त्यापेक्षाही व्यक्ती केंद्रित नेतृत्व म्हणून शहरमध्यमध्ये तौफिक शेख यांना अल्पसंख्यांक समाज मानतो. आगामी विधानसभेच्या निवडणुकीतदेखील तौफिक हे या मतदारसंघातून एमआयएम पक्षाच्यावतीने उभे ठाकल्यास अल्पसंख्यांकांची मोठय़ा संख्येने असलेली मते पुन्हा या खेपेसदेखील तौ†िफक शेख यांच्या बाजूने वळू शकतात. हे लक्षात घेऊन तौफिक यांनाच काँग्रेसमध्ये घेऊन शहरमध्यमधील प्रणितींची अडचण दूर करण्याचा अट्टाहास सुशीलकुमारांनी सुरु ठेवल्याची त्यांच्या अत्यंत निकटवर्तीयांमध्ये चर्चा आहे.