|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जनरल मोटर्सची भारतीय चालक

जनरल मोटर्सची भारतीय चालक 

‘सर्वे गुणाः कांचनम् आश्रयन्ते’ असं एक वचन आहे. संपत्तीच्या चमचमाटामुळे माणूस दबून जातो, नमतो. पैशाने सत्ता विकत घेता येते. सत्ताधाऱयाला आपल्या कह्यात ठेवता येतं. श्रीमंत माणसाच्या मताला भाव मिळतो. संस्थांना आर्थिक मदत, देणग्या वगैरे देऊन, राजकारण्यांना साह्य करून पैसा आपली सत्ता प्रस्थापित करत असतो. परंतु कल्याणकारी सरकार आल्यावर केवळ पोट भरण्यासाठी कुणाची गुलामगिरी करणं भाग पडत नाही. त्यामुळे प्रखर सत्तेची पकड सैल पडत चालली आहे. महाविद्यालयीन जीवनात अर्थशास्त्र अभ्यासताना अर्थतज्ञ जॉन केनेथ गालब्रेथ माझ्या वाचनात आले. खुल्या बाजारात सरकारी हस्तक्षेप आवश्यक आहे, असं त्यांचं मत होतं. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आर्थिक-सामाजिक उन्नती करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे. सुसंस्कृत, विवेकी, सहृदय समाजाचं हे लक्षण आहे, असं गालब्रेथ म्हणायचे. साम्राज्यवादी-भांडवलशाही सत्तेचा नायनाट करा, असा साम्यवाद्यांचा नारा असतो. पण भांडवलशाही आहेच. उलट साम्यवादी देशच कुठे दिसतात का, हे शोधावं लागत आहे! या भांडवलशाही देशांची मक्का म्हणजे अमेरिका. तिथल्या भांडवलशाहीच्या प्रतीकांमध्ये जनरल मोटर्स या कंपनीचा समावेश होतो. तिथे कुणी गौरवर्णीय युरोप वा अमेरिकन पुरुषच उच्चपदावर असतो, असं नाही. आता तर जनरल मोटर्स या आघाडीच्या वाहन उत्पादन कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून दिव्या सूर्यदेवरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. 110 वर्षांचा इतिहास असलेल्या या कंपनीचं नेतृत्व करण्याची संधी एका भारतीय स्त्रीला मिळते आहे, ही अभिमानाची व कौतुकाची बाब नाही का? तुम्ही उत्तम शिक्षण घेतलं असेल, तुमच्यात जर गुणवत्ता असेल, तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही, हेच खरं.

39 वषीय दिव्याने वयाच्या बाविशीत वाणिज्य विषयात पदवी मिळवली. हार्वर्ड विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापन शिकण्यासाठी ती अमेरिकेला गेली. 2002 साली दिव्या जागतिक बँकेत प्रशिक्षणार्थी म्हणून लागली. तिथे तिचा दृष्टिकोन विस्तारला. मग यूबीएस वगैरे कंपन्यांमधून तिने नोकरी केली आणि त्यानंतर ती जनरल मोटर्समध्ये गेली. मागची 14 वर्षं ती या कंपनीत आहे. परंतु तिचं कार्यकौशल्य, नियोजन, दूरदृष्टी बघून दिव्याला ‘सीएफओ’सारखं पद देण्यात आलं आहे. ‘तिला अजून खूप शिकायचं आहे’, असं म्हणून तिला मागे ठेवण्यात आलं नाही. तिचे केस पांढरे होण्याची प्रतीक्षा केली गेली नाही.

दिव्यावर कोणती जबाबदारी होती? तुम्हाला सॉफ्टबँक माहीत असेल. भारतातही सॉफ्टबँकेची विविध क्षेत्रांमध्ये मोठमोठी गुंतवणूक आहे. या सॉफ्ट बँकेतून जनरल मोटर्स समूहातील एका कंपनीसाठी निधी मिळवणं ही जबाबदारी. दिव्या हे काम करून थांबली नाही. तिने बऱयाच स्टार्टअप्सना जी. एम. मध्ये आणलं. कंपनीचा खर्च घटवणं, त्यासाठी उत्पादनाच्या सर्व खात्यांवर लक्ष ठेवणं, स्वस्तात भांडवलाची तजवीज करणं या सर्व सीएफओच्याच जबाबदाऱया. पुन्हा हे करताना, आपली स्पर्धा फोर्डच्या तोडीच्या अमेरिकन आणि युरोपीय व चिनी कंपन्यांशी आहे याचं भान ठेवावं लागतं. त्याकरिता जी. एम.च्या त्रुटी कोणत्या, त्या कशा दूर कराव्या लागतील, भविष्यात काय करावं लागेल, याकडे दिव्याचं लक्ष असतं. दुसरीकडे, दिव्याला बॉक्सिंगची आवड आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपनीला ठोसे लगावायचे, पण समोरून ठोस मारले गेले की ते चुकवायचे हे काम तिला लीलया जमत असणार!

 दिव्याचे वडील ती लहान असतानाच वारले. त्यामुळे आईनेच आणि तिला आणि तिच्या दोन मोठय़ा बहिणींना वाढवलं. तिची आई सिंडिकेट बँकेत काम करायची. आज दिव्या व तिच्या दोन्ही बहिणी अमेरिकेत असतात. आई नि मुलीचे बंध खूप घट्ट असतात. बाईला वैधव्य आलं, तर ती आणखीनच कणखर बनते, हे आपण नेहमीच बघतो. प्रतिकूल परिस्थितीचा ती मोठय़ा धैर्याने मुकाबला करते. दिव्यामध्ये आईचे हे गुण आपोआप आले. शाळेत ती सर्व परीक्षांमध्ये पहिली यायची. चार्टर्ड अकौंटन्सी करत असतानाही ती रँक होल्डर होती. हार्वर्डमध्येही तिने नेत्रदीपक कामगिरी बजावली.

दिव्याने यूबीएस फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये दीडेक वर्ष इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केलं. सरकार किंवा कंपन्यांसाठी निधी उभारणी करणं हे त्याचं काम असतं. क्लाएंटसाठी कर्जरोखे वा समभाग विक्री करून भांडवल उभारणं, डेरिव्हेटिव्हजसारख्या गुंतवणूक साधनांमध्ये संधी उपलब्ध आहे की नाही, याचा सल्ला देणं, ताबा व विलीनीकरणाबद्दल मार्गदर्शन करणं अशी बरीच कामं इन्व्हेस्टमेंट बँकरला करावी लागतात. गेल्या वषीपासून कॉर्पोरेट फिनान्स विभागाची उपाध्यक्ष असल्यापासूनच, दिव्यावरची जबाबदारी वाढली. जनरल मोटर्स ही कंपनी बुईक, कॅडिलॅक, शेवरलेट कार्स बनवण्याबद्दल प्रसिद्ध आहे, हे अनेकांना माहीत असेलच. या कंपनीचा एस अँड पीच्या 500 बडय़ा कंपन्यांमध्ये अंतर्भाव होतो. दिव्याचं वैशिष्टय़ हे की, दोन वर्षांपूर्वी तिला वाहन क्षेत्रातील ‘उगवता तारा’ हा किताब मिळाला आणि गेल्या वषी तर ती डेट्रॉइट उद्योगातील ‘टॉप फोर्टी’ मध्ये सामील झाली! हे लक्षात घ्यायला हवं की, दिव्यावर कंपनीच्या रिटायरमेंट प्लॅनच्या 80 अब्ज डॉलर्स इतक्मया प्रचंड निधीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. भांडवल नियोजन, शेअर बाजारातील व्यवहार, जगभरातील कंपनीचे बँकिंग व्यवहार, जोखीम व्यवस्थापन, गुंतवणूकदारांबरोबरचे संबंध अशा कितीतरी गोष्टी दिव्याला पहाव्या लागतात.

सुंदर पिचई हे आज गुगलचे सीईओ आहेत. दिव्याप्रमाणे तेही चेन्नईचे. अँड्रॉइड, क्रोम, मॅप्स वगैरे गुगलच्या प्रॉडक्ट्सचं श्रेय पिचईंकडेच जातं. कारण ते आधी प्रॉडक्ट हेड होते. ‘डोब’ या कंपनीच्या जागतिक संशोधन विभागाचे वरि÷ उपाध्यक्ष म्हणून लागलेले, मूळ हैदराबादचे शंतनु नारायण हे या कंपनीचे सीईओ आहेत. हैदराबादचेच सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे मुख्याधिकारी, म्हणजे सीईओ आहेत. मेमरी स्टोअरेज क्षेत्रातील सॉडिक कंपनीचे सहसंस्थापक संजय मेहरोत्रा आहेत. ग्लोबल फौंड्रीजचे (जिच्या सेमिकंडक्टर फौंड्रीत एएमडी, ब्रडकॉम वगैरे बडय़ा कंपन्यांना लागणाऱया चिप्सचं उत्पादन केलं जातं) सीईओ म्हणून संजय झा खूप नावाजले गेले आहेत. 2014 सालापासून नोकियाचे सीईओ म्हणून राजीव सुरी तळपत आहेत. बेस्टअप या कंपनीचे सीईओ व अध्यक्ष जॉर्ज कुरियन केरळचे. तर जगद्विख्यात कॉग्निझंट या कंपनीचे सीईओ आहेत फ्रान्सिस्को डिसूझा, हे नैरोबीत जन्मले असले, तरी ते आहेत मूळच्या गोव्याच्या कुटुंबातले. सॉफ्टवेअर क्षेत्रातील सर्वात तरुण सीईओ आहेत ते.

तुम्ही ऑडिओ गिअरमधल्या ‘हरमन’ ब्रँडबद्दल कधीतरी ऐकलं असेलच. तर त्या हरमन इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत दिनेश पालिवाल आणि अशोक वेमुरी हा भारतीय माणूस 110 वर्षांचा इतिहास असलेल्या ‘झेरॉक्स’ बिझिनेस सर्व्हिसेस एलएलसीचा सीईओ आहे. मात्र त्या मानाने जगद्विख्यात कंपन्यांवर अधिराज्य गाजवणाऱया भारतीय स्त्रिया कमी दिसतात. दिव्या तर वाहन क्षेत्रासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात आहे. जागतिकीकरण झाल्यापासून एका देशातून दुसऱया देशात भांडवल जात-येत असतं. बाजारपेठांमध्ये चढउतार खूप आहेत. ही वित्तीय भांडवलशाही आहे. साधारणतः स्त्रीला घर कसं चालवायचं हे ठाऊक असतं. मला वाटतं, आपण या जुन्या चौकटीत विचार करणं थांबवायला हवं. स्त्री घराबाहेरचे व्यवहारही तेवढय़ाच समर्थपणे सांभाळते. आपल्याकडे साहित्य किंवा राजकीय क्षेत्रात थोडं जरी यश मिळालं की माणसं एकदम खूश होतात. दिव्यासारख्यांनी तर आपलं यश मिरवायलाच हवं. पण तिने या पदाचा स्वीकार मोठय़ा विनम्रतेने केला आहे.

नंदिनी आत्मसिद्ध

Related posts: