|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » उद्योग » बीएसईमधील 222 कंपन्या आजपासून होणार सूचीबाहय़

बीएसईमधील 222 कंपन्या आजपासून होणार सूचीबाहय़ 

वृत्तसंस्था/ मुंबई

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आपल्या प्लॅटफॉर्मवरील 222 कंपन्यांना आजपासून सूचीबाहय़ करणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या कंपन्यांच्या समभागात जास्त वेळ ट्रेडिंग होत नसल्याने ही कारवाई करण्यात येईल असे बीएसईकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार समजते. गेल्या काही महिन्यात सरकारकडून बनावट कंपन्यांविरोधात कारवाई करत असतानाच ही पावले बीएसईकडून उचलण्यात आली.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सेबीने बीएसईला 331 संशयास्पद कंपन्यांविरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. पैशांचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखण्यासाठी सरकारने 2 लाख शेल कंपन्यांवर बंदी घातली आहे. यापैकी 210 कंपन्यांचे ट्रेडिंग गेल्या 6 महिन्यांपासून रोखण्यात आले आहे. 4 जुलैपासून या कंपन्या सूचीबाहय़ होणार आहेत.

एशियन इलेक्ट्रॉनिक्स, बिरला पॉवर सोल्युशन्स, क्लासिक डायमंड्स इंडिया लिमिटेड, इनोव्हेटिव्ह इन्डस्ट्रीज, पॅरामाऊन्ट प्रिन्टपॅकेजिंग, एसव्हीओजीएल ऑईल गॅस ऍण्ड एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीला सूचीबाहय़ करण्याच्या नियमानुसार प्रवर्तक, संचालक, समूह कंपन्यांना कारवाई करण्यात आल्यापासून 10 वर्षांसाठी ट्रेडिंग करण्यास प्रतिबंध लादण्यात येतील. सामान्य समभागधारकांकडील समभाग प्रवर्तकांना खरेदी करावे लागतील. या कंपन्यांना सेबीच्या आदेशानुसार 5 वर्षांसाठी एक्स्चेंजच्या डिस्सेमिनेशन बोर्डजवळ पाठविण्यात येईल.

Related posts: