|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » महिला विरूद्ध पुरूष ‘कलगी-तुऱया’वर बंदी!

महिला विरूद्ध पुरूष ‘कलगी-तुऱया’वर बंदी! 

जाखडी नृत्यांतीला विकृतीला चाप

कलगी तुरा मंडळ समन्वय समिती बैठकीत निर्णय

समितीतून तीन शाहिर निलंबित

प्रतिनिधी /चिपळूण

कलगी-तुराच्या महिला विरूध्द पुरूष सामन्यामध्ये एकमेकांना शिवीगाळीसह बिभत्सतचे दर्शन घडत असल्याने यापुढे अशा सामन्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथे झालेल्या कलगी तुरा समाजोन्नती मंडळ आणि कलगी-तुरा समन्वय समितीच्या संयुक्त बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर तीन शाहिरांना निलंबित करण्याचा ठरावही सर्वानुमते संमत करण्यात आला आहे.

मुंबई येथील सोशल सर्व्हीस लिग परेल येथे मंडळाचे अध्यक्ष अनंत तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला शाहीर मंडळीमध्ये राजापूर, लांजा, देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, महाड, माणगाव, मंडणगड, मुंबई येथील शक्ती-तुरा शाहीर चिठ्ठी मालक व सर्व कलगी-तुरा समाजोन्नती मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

महिला विरूद्ध पुरूष यांच्यात होणाऱया सामन्यात अश्लिल बोलून एकमेकांना दुखावले जात असल्याचा विषय समन्वय समिताच्या बैठकीत चर्चेला आल्यानंतर काही गाण्यांचे रेकॉर्डींगही सादर करण्यात आले. एखाद्या चांगल्या कार्यासाठी कलगी तुरा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, परंतु या कार्यक्रमात एकमेकांना शिव्या देऊन कार्यक्रमाची शोभा वाढते का, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. मद्यपी ज्या पध्दतीने बरळतो, त्याहीपेक्षा या जाखडी नृत्यातून अश्लिल बोलले जाते. यामुळे चर्चेअंती यापुढे पुरूष विरूद्ध महिला सामन्यांना बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यापुढे पुरूष अथवा तुऱयाचा शाहीर महिला शाहिराबरोबर कार्यक्रम करेल त्याच्याबरोबर समन्वय समितीचा एकही शाहीर सहभागी होणार नाही.

दरम्यान, आता कुठे जाखडीला चांगले दिवस येत असतानाच जाखडी कला रसातळाला नेण्याचे प्रयत्न होत आहेत. पूर्वी जाखडीत शास्त्रीय गाणी गायली जात असत. आता काळ बदलला आहे. देवदेवतांची विटंबना ही आताची संस्कृती बनू लागली आहे. तुरेवाल्या पक्षाने राधेला आणि शक्तीवाल्याने श्रीकृष्णाला काहीही बोलावे ही शोकांतिका आहे. यामुळे यावर समन्वय समितीने निर्णय घेत कायदेशीर सल्ला घेऊन यापुढे महिला-पुरूष सामन्यावर बंदी व काही शाहिरांच्या उपलब्ध झालेल्या रेकॉर्डींगबाबत सेन्सॉर बोर्डापर्यंत पोहोचवून यातील गाण्यांना परवानगी कशी देण्यात आली, अशी विचारणा करण्याचे ठरले आहे.

या सभेत तुषार पंदेरे, वसंत भोईटे, रत्नाकर महाकाळ या शाहिरांना मंडळातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शाहीर दत्ता आयरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवले आहे.

………