|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सीआरझेड दुरुस्तीबाबत पेडणे तालुक्यात फोफावला पत्त्यांचा जुगार

सीआरझेड दुरुस्तीबाबत पेडणे तालुक्यात फोफावला पत्त्यांचा जुगार 

प्रतिनिधी/ पणजी

पेडणे तालुक्यात ड्रग्ज, मटका जुगार, पत्यांचा जुगार तसेच इतर गुन्हेगारी प्रकार  मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. बेकायदेशीररित्या चालणाऱया या पत्यांच्या जुगारात दर दिवशी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. स्थानिक पोलिसांना या सगळ्या प्रकारांची पुरेपूर माहिती असते, मात्र पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत, उलट आपला हप्ता घेऊन मोकळे होतात. एकंदरीत स्थानिक पोलीस राजकारण्यांच्या ताटाखालची मांजरे बनली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराबाबत तालुक्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

काही दिवसापूर्वी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी स्वतः मोरजी येथे एका ठिकाणच्या मटका अडय़ावर छापा मारून सुमारे 60 लाख रुपये जप्त केले आहेत. मटका जुगारातील साहित्यासह 11 जणांना अटक केली होती.

पेडणे तालुक्याच्या कानाकोपऱयात जुगार

मटका व पत्यांचा जुगार पेडणे तालुक्यातील कानाकोपऱयात जोमात सुरु आहे.  महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हय़ातील लोकही हा जुगार खेळण्यासाठी खास गाडय़ा घेऊन गोव्यात येत असतात. जुगार खेळण्यासाठी येणाऱयांना सिगारेट, गुटखा, मद्य तसेच जेवणासारख्या सगळ्या सुविधा पुरविल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे. वाढत्या जुगार प्रकारमुळे युवापिढी बरबाद होताना दिसून येत आहे.

इब्रामपूर ते पत्रादेवी बनला थापटी बेल्ट

पेडणे तालुक्यातील इब्रामपूरपासून पत्रादेवीपर्यंत प्रत्येक गावात जुगाराचे अड्डे चालत आहेत. त्यामुळे या परिसराची ‘थापटी बेल्ट’ म्हणून नवी ओळख तर होणार नाही ना, अशी चिंता आहे. पेडणे शहरात चक्क पोलीस स्थानकाच्या काही अंतरावर एक जुगाराचा अड्डा राजरोस चालत आहे. काही गावात दोन ते तीन अड्डे चालत आहेत. किनारी भागात तर क्लब चालविले जातात आणि त्यात राजरोस जुगार सुरु असतो.

पोलीस तसेच राजकारण्यांना जातात हप्त?

जुगाराचे हप्ते गोळा करून ते राजकारण्यांपर्यंत पोचविण्याचे काम पोलीसच करीत आहेत. दर महिन्याला सुमारे लाखो रुपयांचा हप्ता येत असतो. नंतर त्याची विशिष्ट प्रमाणात वाटणी केली जाते. या जुगारांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अगोदरच सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या वाढत असून बेकारीला कंटाळलेला युवक जुगारासारख्या बेकायदेशीर कारभाराकडे वळत असतो. जुगारात पैसे संपले की युवक चोरी करण्याच्या मार्गाकडे वळतात, असे अनेक प्रकार घडलेले आहेत.

अधीक्षक चंदन चौधरी यांची प्रशंसा

सर्वसामान्य जनतेला या प्रकारांचा त्रास होतो. मात्र उगाच कटकटक कशाला म्हणून सुजाण नागरिकही काही आवाज करीत नसल्याचे दिसून येत आहे. उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी यांनी केलेल्या कारवाईचे पेडणेवासियांनी मनापासून स्वागत केले आहे. सोशियल माध्यामातून त्यांचे अभिनंदन केले असून अशा प्रकारच्या कारवाया सुरुच ठेवा आणि पेडण्यातील गुन्हेगारी प्रकार नष्ठ करा अशा मागण्याही होत आहेत. जुगार ड्रग्ज या प्रकारामुळे संपूर्ण पेडणे तालुका पोखरला जात आहे.

राजेंद्र आर्लेकरांच्या काळात बंद होता जुगार

पेडणे मतदारसंघात राजेंद्र आर्लेकर हे भाजपचे आमदार-मंत्री असताना हा बेकायदेशीर जुगार पुर्णपणे बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा जुगार फोफावला आहे. पोलीसही आता या प्रकाराकडे जाणूनबुजून डोळेझाक करीत आहे. आर्लेकर यांच्या कार्यकाळात स्थानिक महिलांनी पेडण्यातील जुगार बंद करावा म्हणून निवेदन दिले होते. त्यावेळी आर्लेकर यांनी ठोस निर्णय घेऊन पेडण्यातील जुगार पूर्णपणे बंद केला होता. आता पुन्हा संपूर्ण पेडणे तालुक्यात जुगाराचे अड्डे तयार झाले आहेत. याविरोधात आता स्थानिक महिलांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुजाण नागरिक करीत आहेत.

गुन्हेगारांकडून पोलिसांवरही हल्ले

सध्या स्थितीत तरी पेडणे तालुका हा गुन्हेगारी प्रकरणाचा हब बनल्याचे दिसून येत आहे. विशेस्तः किनारी भागात गुन्हेगारी प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. गावगुंड व ड्रग्ज लॉबीने डोके वर काढले असून, कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलासांवरही हल्ला करण्याइतपत त्यांची मजल गेली आहे. 7 ऑक्टोबर 2017 रोजी एनसीबीचे पोलीस अमली पदार्थाविरोधात कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरच हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. ज्यांनी हा हल्ला केला होता त्यांच्या विरोधात अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही, केवळ त्यांना पोलीस स्थानकात आणून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

राजकारण्यांच्या आशीर्वादाने गावगुंडांची दादागिरी

किनारी भागात अनेक स्थानिक युवकही मोठय़ा प्रमाणात अमलीपदार्थाच्या आहारी गेले आहेत. सुरुवातीला शॅक्समध्ये काम करतात आणि नंतर ड्रग्ज त्यांच्या वर झडप घालतो. हेच युवक नंतर रात्री अपरात्री रस्त्याच्या कडेला घोळके करून बसतात आणि ड्रग्ज घेत असतात. याच्यातून नंतर भांडण, तंटे व इतर गुन्हेगारी प्रकार जन्माला येत असतात. गावागावातून गावगुंडांनी डोके वर काढले असून त्यांची दादागिरी सुरु झाली आहे. प्रत्येकजण राजकीय नेत्याच्या आधाराने आपला दबदबा निर्माण करण्यासाठी ते सामान्य लोकांना नाहक त्रास देत आहेत. रस्त्याच्याकडेला, पुलाच्या कठडय़ावर, किंवा अन्य ठिकाणी गावागावातून रात्री अपरात्री गावगुंड बसून नशेच्या आहारी जाताना दिसत आहे. पोलिसांना सगळे काही माहीत असूनही पोलीस काही करू शकत नाहीत. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त होत आहे.

Related posts: