|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडची बाजी!

पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडची बाजी! 

जादा वेळेपर्यंतच्या गोलकोंडीनंतर कोलंबियाला 4-3 फरकाने नमवले

मॉस्को / वृत्तसंस्था

शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेल्या व पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने कोलंबियाविरुद्ध 4-3 असा रोमांचक विजय संपादन केला आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जोरदार धडक मारली. पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियाने पहिल्या तीन प्रयत्नात तीन गोल केले तर इंग्लंडने 2 गोल केले होते. त्यानंतर शेवटच्या दोन प्रयत्नात कोलंबियाला एकही गोल करता आला नाही तर इंग्लंडने दोन्ही प्रयत्नात यशस्वी गोल करत एकंदरीत 4-3 असा विजय संपादन केला. तत्पूर्वी, निर्धारित व जादा वेळेत उभय संघात 1-1 अशी गोलकोंडी कायम राहिली होती.

निर्धारित वेळेतील लढतीत उभय संघात जोरदार जुगलबंदी रंगत असताना इंग्लंडने बऱयापैकी वर्चस्व गाजवले होते. हॅरी केनने 57 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करुन देत संघाला आघाडीवर आणले होते. त्यानंतर जवळपास 33 मिनिटे इंग्लंडने उत्तम वर्चस्व गाजवले. अर्थात, इन्जुरी टाईममध्ये शेवटच्या क्षणी अर्थात, 93 व्या मिनिटाला कोलंबियाच्या येरी मिनाने अफलातून असा गोल नोंदवत संघाला अनपेक्षित बरोबरी साधून दिली. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडची बाजी झाली.

या स्पर्धेत आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दि. 6 व 7 जुलै रोजी प्रत्येकी दोन उपांत्यपूर्व सामने खेळवले जातील. त्यानंतर दि. 9 व 10 जुलै रोजी प्रत्येकी एक उपांत्य सामना तर दि. 15 जुलै रोजी फायनल होणार आहे. याच दिवशी तिसऱया स्थानासाठी प्ले-ऑफ लढत देखील खेळवली जाणार आहे. आजच्या निकालासह हॅरी केन गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर पोहोचला असल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्याच्या खात्यावर सर्वाधिक 6 गोल आहेत.