|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » युवकांनो पुढाकार घ्या, ‘शेती करा’ : विजय सरदेसाई

युवकांनो पुढाकार घ्या, ‘शेती करा’ : विजय सरदेसाई 

सागर जावडेकर/ पणजी

आम्ही शेतकऱयांसाठी काय करीत नाही? 120 योजना राबवून शेतकऱयांना नांगरणी, लागवड, कापणी, सेंद्रीय खते एवढेच नव्हे तर शेतीला आवश्यक कुंपणाला सबसिडी देतोच एवढे झाल्यानंतर शेतमालाला देखील आधारभूत किंमत देतो. एवढेच! की आता शेती करा. युवकांनो राज्यात 50 टक्के अद्याप पडीक असलेल्या शेत जमिनीत उतरा. तुमच्या पायांना थोडी माती लागू द्या. राज्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई गोव्यातील युवकांना ‘शेती करा’ असा मूलमंत्र देत आहेत.

‘तरुण भारत’शी विशेष मुलाखत देताना ते म्हणतात की, आपला देश आपले राज्य किमान अन्नाच्या बाबतीत तरी कोणावर विसंबून राहाण्याची पाळी येऊ नये. आपण शेतीसाठी फार प्रयत्न करतोय. उद्देश आहे पुढील दोन ते तीन वर्षात राज्यातील शेतीविना पडीक असलेल्या जागेचा जास्तीत जास्त वापर करुन ती शेतीखाली आणावी. युवकांनी आता पुढाकार घ्यावा. ‘शेती करा’ हाच माझा कानमंत्र राहील.

आपला भर अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीवर. तंत्रज्ञान चांगले असले तर तुम्ही कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन घेऊ शकता. ते देखील सेंदीय खतांचा वापर करुन. आपण स्वतः शेतकरी आहे. आपण कृषी पदवीधर आहे. आपणही कृषी क्षेत्रात स्वतः प्रयोगशील असा शेतकरी आहे हे सांगताना मला स्वतःला फार मोठा अभिमान वाटतो. केवळ दुसऱयांना शेती करा म्हणून सांगून होत नाही तर ‘आधी केले मग सांगितले’ या धर्तीवर आपण शेतात उतरतो. काम करतो. माझ्याकडे माडही आहेत. आज पहा आमच्याकडे 40700 हेक्टर भात पिकाची शेती आहे. त्यातील 27600 हेक्टर खरीप व 13100 हेक्टर क्षेत्र हे रब्बी आहे. 25900 हेक्टर क्षेत्रात नारळ लागवड आहे आणि 56700 हेक्टर क्षेत्रात काजू आहे.

पडीक जमिनीचे शेतजमिनीत रुपांतरण करण्याचे उद्दिष्ट

दुर्दैवाची बाब म्हणजे यातील 50 टक्के जमीन ही वापरली जात नाही. पडीक आहे. मात्र या पडीक जमिनीचे रुपांतरण करु देणार नाही. माझ्यासमोर एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान म्हणजे आजच्या युवकांकडून या 50 टक्के जमिनीचे पुन्हा शेतजमिनीत रुपांतरण करणे. पुढील तीन वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची इच्छा आहे. आव्हान आपण स्वीकारले. गोव्याला आता थोडे बदलावे लागेल. एककाळ असा होता गोव्यातील 70 टक्के पेक्षाही जादा जनता केवळ कृषी क्षेत्रावर विसंबून होती. आज हे प्रमाण 20 ते 25 टक्के पेक्षाही खाली आलेय. हा ग्राफ आपल्याला पुन्हा वाढवायचा आहे.

काँट्रक्ट फार्मिंगसाठी प्रयत्न

येथील युवावर्ग दुबईला जातो, मस्कतला जातो. तिथे वाट्टेल ती कामे करतो आणि आपल्या गावात गायी, म्हशींना हात लावयाला कंटाळतो. मातीत हात घालण्यास तयार नसतो. परंतु, आता आम्ही शेती लावणी, कापणी, नांगरणी एवढेच नव्हे तर तणापासून भात अलग करणारी यंत्रणाही शेतावरच उपलब्ध करुन देतो. कमीत कमी कामगारांत चांगली शेती होऊ शकते. नगदी पिके घेऊ पाहात असाल बेबीकॉर्न, सिमला मिरची वगैरे व तत्सम उत्पादने जर ग्रीन हाउसमध्ये तयार केली तर उत्पादन जास्त आणि खर्चही कमी. जे दुबईत जाऊन मिळविणार तेच इथे शेतीतूनही मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न मात्र आवश्यक आहे. ग्रीन हाउस किंवा पॉली हाउस घालणार तरी देखील मोठय़ा प्रमाणात सबसिडी देतो. एवढेच नव्हे तर आता काही पडीक जमिनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कसले उत्पादन घेता येईल यावर विचार करतोय. जमिनी ताब्यात घेऊन शेती करणाऱयांना देऊ. काँट्रक्ट फार्मिंगसाठी आमचे प्रयत्न आहेत. गोवा सरकार जमीन मालकांसाठी हमी राहील. त्यामुळे शेती करुन झाल्यानंतर शेत मालकाला त्याची जमीन परत करता येईल.

विजय सरदेसाई यांनी स्वतः रत्नागिरीहून लाल तांदुळाचे वाण गोव्यात आणले. बासुमतीसारखा सुगंध या तांदुळाला येतो. या भाताची रोपटी प्रयोगादाखल त्यांनी अनेकांपर्यंत पोहोचविली आहेत.

‘डिजे कोकोनट’ द्वारे नारळाचे उत्पादन वाढविणार

आपल्याला आता नारळ उत्पादन वाढीकडे देखील गांभिर्याने लक्ष द्यावयाचे आहे. गोव्यात असंख्य माड आहेत. परंतु ते फार उंच ठिकाणी आहेत. नारळ काढायचे कसे? नारळही फार लागत नाहीत व नारळ उतरविणारे ‘पाडेली’ त्यांची संख्याही कमी झाली. यावर पर्याय म्हणून गोव्यातील बाणावली व अन्य जातींच्या रोपटय़ावर  प्रयोग केले आणि एका गोमंतकीयाने डिजे कोकोनट ही जात विकसित केली. नारळ उत्पादन अवघ्या तीन वर्षात मिळेल व माड उंच होत नाही. हाताने नारळ काढता येईल मात्र या नारळाच्या रोपटय़ाला व वाढत्या माडाला दिवसाचे 7 तास उन मिळाले पाहिजे अशा ठिकाणी हे माड लावावे लागतील. हा माड एकाचवेळी 250 ते 300 नारळ सहज देणारा आहे. गोवा सरकार अशा नारळाच्या विकासाला मदत करीत आहे व पुढील काही वर्षात गोव्यात अनेक ठिकाणी बुटके माड दिसतील व नारळाचे उत्पादनही वाढलेले असेल. गोवा नारळाच्या बाबतीत तरी शेजारील राज्यांवर विसंबून राहाता कामा नये.

आपले नारळावर, माडावर एवढे प्रेम आहे की, माझ्या पक्षाचे चिन्हच मुळी नारळ आहे आणि माडाला संरक्षण देणारा कायदा आम्ही विधानसभेत मांडलाच शिवाय माडाला राज्य वृक्षाचा दर्जाही मिळवून दिला, विजय सरदेसाई सांगत होते.

पुढील तीन वर्षात काजू उत्पादन वाढणार

पुढील तीन वर्षात काजू उत्पादनात प्रचंड वाढ होईल याची ग्वाही कृषीमंत्री विजय सरदेसाई हे देतात. गोव्याच्या काजूला वेगळी रुची आहे. त्यात गोडवा आहे मात्र आपल्याकडे आज काजूची प्रचंड पारंपरिक झाडे आहे त्यात काजू बी पेक्षा फेणीसाठी असलेल्या बोंडूचा आकारच मोठा आहे. एखाद्या झाडाला कमाल 3 किलो काजू लागतात. या उलट वेंगुर्ला – 7 व आता तयार केलेले नवे वाण वेंगुर्ला – 9 यातून एकेक झाड 15 किलो काजू देऊ शकते. झाड लावल्यानंतर तिसऱया वर्षात फलधारणा सुरु होते. शेतकऱयांसाठी ही नवी काजूची जात हे एक मोठे वरदान आहे. यावर्षी आम्ही जी 50 हजार झाडे जनतेला देणार आहोत त्यात वेंगुर्ला 7 व वेंगुर्ला 9 या जातींच्या काजू झाडांचाही समावेश करणार आहोत.

कोमुनिदाद जागेत फळझाडे लावणार

लवकरच आम्ही एक योजना तयार करीत आहोत आणि त्याद्वारे कोमुनिदाद जागेत मोठय़ा प्रमाणात फळझाडे लावू. सात वर्षांसाठी कोमुनिदादची जमीन आम्ही ताब्यात घेऊ. फळ झाडांची मोठय़ा प्रमाणात लागवड केल्यानंतर व झाडे वाढल्यानंतर त्यांची जागा त्यांना परत करु. कोमुनिदादला फळे खाऊ द्या. वा विक्री करु द्या.

झाडे लावण्याचे दोन उद्दिष्ट समोर ठेवत आहोत. या झाडांमुळे माणसाचे जीवन सुधारते व झाडे म्हणजे फुफफुसे आहेत.

Related posts: