|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आमदार हुक्केरींची सरकारच्या मुख्य प्रतोदपदी निवड

आमदार हुक्केरींची सरकारच्या मुख्य प्रतोदपदी निवड 

प्रतिनिधी/   चिकोडी

चिकोडी-सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांची राज्यातील जेडीएस-काँग्रेस संमिश्र सरकारच्या मुख्य प्रतोदपदी (मुख्य सचेतक) म्हणून निवड करण्यात आली. सदर निवडीबाबत 4 रोजी कर्नाटक विधानसभेच्या सचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. सदर निवडीमुळे चिकोडी परिसरातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करताना फटाक्यांची आतषबाजी केली.

विधानसभेमध्ये सभाध्यक्ष रमेश कुमार यांनी गणेश हुक्केरी यांच्या प्रतोदपदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली. खासदार प्रकाश हुक्केरी यांचे पूत्र आमदार गणेश हुक्केरी यांच्या या निवडीमुळे चिकोडी-सदलगा परिसरातील कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एमबीएपर्यंत शिक्षण झालेल्या गणेश हुक्केरी यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. जिल्हा पंचायत सदस्य ते आमदार असा प्रवास त्यांनी पूर्ण केला असून सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये त्यांना महसूल खात्याच्या संसदीय कार्यदर्शीपदी नेमणूक करण्यात आली होती. सध्या मंत्रिपदाचे ते प्रबळ दावेदार होते. पण संमिश्र सरकारमध्ये त्यांना सरकारचे मुख्य सचेतक अर्थात मुख्य प्रतोदक म्हणून नेमण्यात आले आहे. याआधी आमदार पी. एम. अशोक यांनी गत वेळच्या सरकारचे मुख्य सचेतक म्हणून काम पाहिले. पण यावेळी काँग्रेस व निधर्मी जनता दलाचे संमिश्र सरकार अस्तित्वात आल्याने दोन्ही पक्षांतर्फे एकाच मुख्य सचेतकाची निवड करण्याचा दोन्हीही पक्षांनी निर्णय घेतल्याने आमदार गणेश हुक्केरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

निवडीचा आनंद

आमदार हुक्केरी यांच्या या निवडीचे वृत्त टीव्हीवर झळकताच शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदिरानगर, बसस्थानक, नगरपालिका चौक, बसव सर्कल, अंकली खूट आदी ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. गणेश   यांच्या निवडीमुळे सत्ताधारी काँग्रेस-निजद तर विरोधी पक्ष भाजपच्या सचेतकपदी महांतेश कवटगीमठ या चिकोडी तालुक्यातीलच दोन पदवीधर नेत्यांची निवड झाल्याने एक आगळावेगळा इतिहास निर्माण झाला आहे.