|Monday, January 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » नवाज शरीफ यांना 10 वर्षांचा कारावास

नवाज शरीफ यांना 10 वर्षांचा कारावास 

 मुलीला 7 वर्षे तर जावयालाही 1 वर्ष तुरुंगवास 80 लाख पौंड दंडही

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना नॅशनल अकौंटॅबिलिटी न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 80 लाख पौंड दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लंडनमधील ऍव्हनफिल्ड येथील 4 फ्लॅट मालमत्ता खरेदीसंदर्भातील याचिकेबाबत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांची मुलगी मरियम आणि जावई निवृत्त कॅप्टन सफदर यांनाही अनुक्रमे 7 वर्षे व 1 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मारियम यांना 20 लाख पौंड दंडही करण्यात आला आहे.

सध्या शरीफ हे मुलगी मरियमसह त्यांच्या पत्नी कुलसुम यांच्या कॅन्सरच्या आजारपणामुळे लंडनमध्ये आहेत. तथापि न्यायालयाच्या या निर्णयामुळे शरीफ कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे. शरीफ यांनी या आजारपणामुळे हा निकाल आठ दिवस पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र त्याला न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती मोहम्मद बशीर यांनी हा निकाल दिला आहे.

तर पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असून या निर्णयाचा परिणाम नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम यांच्या राजकीय कारकिर्दीवर होणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. शिवाय पोलीस तसेच लष्करी बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

14 जून रोजी लंडनला रवाना होण्यापूर्वी शरीफ यांनी न्यायालयाला विनंती केल्याने या प्रकरणाच्या सुनावणीत त्यांना सूट देण्यात आली होती. सुरुवातीला 25 जूनपर्यंत व नंतर आणखी तीन दिवस मुदतवाढ दिली. तेव्हाही त्यांनी 9 जुलैपर्यंत मुदत मागितली. परंतु त्याला न्यायालयाने नकार दिला होता. ते 29 जूनला परतरणार होते. परंतु अद्यापही ते लंडनमध्येच आहेत.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर नवाज यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांनी न्यायासाठी आम्ही सर्व कायदेशीर आणि संविधानिक मार्ग अवलंबू असे सांगितले आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाचे वृत्त एनआयएने दिले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लंडनमधील ऍव्हन फिल्ड येथील मालमत्ता खरेदी आणि बेहिशेबी मालमत्ते संदर्भातील हे प्रकरण आहे. नवाज शरीफ आणि त्यांच्या तीन मुलांविरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची आणखी चार प्रकरणे सुरु आहेत. यामध्ये या मालमत्तेसह गल्फ स्टील मिल्स, अल अजीजा स्टील मिल्स याच्याशी संबंधितही दावे आहेत. गेल्या सप्टेंबरपासून याची सुनावणी सुरु होती. पनामा पेपरलीक प्रकरणी गतवर्षी पाकिस्तनाच्या उच्च न्यायालयाने निकाल जाहीर केल्यानंतर नॅशनल अकौंटॅबिलिटी ब्युरोने न्यायालयात ही याचिका दाखल केली  होती. पनामा पेपरलीक प्रकरणात नाव आल्यानंतर शरीफ यांना पंतप्रधानपद गमवावे लागले होते. आता त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांच्या व कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.

Related posts: