|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव-बेंगळूर विमानसेवा 11 ऑगस्टपासून पुन्हा सुरू

बेळगाव-बेंगळूर विमानसेवा 11 ऑगस्टपासून पुन्हा सुरू 

बेळगाव  / प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून बेळगावची विमानसेवा बंद होती, ती कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात होता. स्पाईसजेट विमान कंपनीने माघारी घेतल्यानंतर आता अलायन्स एअर कंपनी बेळगाव विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी पुढे सरसावली आहे. 11 ऑगस्टपासून आठवडय़ातून तीन वेळा बेळगावमधून बेंगळूरकडे विमान उड्डाण घेणार आहे. त्यामुळे बेळगावकरांना पुन्हा एकदा आकाशात झेपावण्याची संधी मिळणार आहे.

हुबळी येथे विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर उडान योजनेतून बेळगावची विमानसेवा हुबळीला वळविण्यात आली. त्यामुळे बेळगावच्या नागरिक व उद्योजकांनी याला तीव्र विरोध केला होता. बेळगावहून चेन्नई, मुंबई व बेंगळूर अशी सेवा स्पाईसजेट कंपनीने देऊ केली होती. त्यामुळे बेळगावच्या विकासाला चालना मिळत होती. परंतु ही सेवा अचानकपणे बंद केल्याने नाराजी व्यक्त होत होती.

बेळगावच्या नागरिकांनी ही सेवा पूर्ववत होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आंदोलन उभे केले. त्यामुळे काही काळातच अलायन्स एअर कंपनीने बेळगाव ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बेळगावकरांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. यामध्ये उद्योजक, व्यापारी, लघुउद्योजक संघटना, बेळगाव फौंड्री क्लस्टर, हॉटेल संघटना यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

अधिक विमानफेऱयांसाठी प्रयत्न

(राजेशकुमार मौर्य, संचालक, बेळगाव विमानतळ)

बेळगावमधून स्पाईसजेट कंपनीने माघार घेतल्यानंतर अलायन्स कंपनीने सेवा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बेळगावमधून दररोज येणाजाणाऱया प्रवाशांची संख्या पाहता येत्या काळात देशाच्या विविध भागातून विमानफेऱया सुरू करण्यासाठी विमान प्राधिकरण प्रयत्नशील आहे.

अशी असणार विमानसेवा

बेळगावमधून मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी विमानसेवा देण्यात येणार आहे. मंगळवारी सायं. 5.05 मि. विमान बेळगावला येणार असून 5.35 बेंगळूरकडे उड्डाण घेणार आहे. गुरुवारी व शनिवारी दुपारी 3.35 वा. बेळगावला येणार असून 4.05 वा. बेंगळूरकडे उड्डाण करणार आहे.

Related posts: