|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुसळधार पावसाचा जपानमध्ये कहर

मुसळधार पावसाचा जपानमध्ये कहर 

पूरामुळे 38 जणांचा मृत्यू : 47 जण बेपत्ता

वृत्तसंस्था/ टोकियो

 जपानमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 38 जणांना जीव गमवावा लागला असून 4 जण जखमी झाले आहेत. तर किमान 47 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले.हे.

दक्षिण-पश्चिम जपानला मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसला असून अनेक भागांमध्ये पुराने जनजीवन पूर्णपणे कोलमडून गेले आहे. क्योटो शहर पूरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले. शहरातील रस्त्यांना सरोवराचे स्वरुप प्राप्त झाले असून पुरापासून बचावासाठी अनेक जण घरांच्या छतावर चढून बसले आहेत. अशा लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. अनेक बंधाऱयांच्या मदतीने पूर नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागुची शहरात देखील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर इशारा देण्यात आला आहे.

भूस्खलनाचा धोका असणाऱया भागातील रस्त्यांवरील वाहतूक रोखण्यात आली आहे. हिरोशिमामध्ये इमारत कोसळल्याने पाच जणांनी जीव गमवावा लागला.

 इमारतीच्या ढिगाऱयाखाली अडकलेल्या अन्य लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत तसेच बचावकार्य सुरू आहे. पूरप्रभावित भागांमधून 360000 लोकांना दुसरीकडे हलविण्यात आले. मदत तसेच बचावकार्यासाठी एकूण 48000 सदस्य कार्यरत आहेत.

प्रशासनाने दोन लाखांहून अधिक जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची सूचना केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना उधाण आले असून भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. प्रतिकूल हवामान पाहता पश्चिम तसेच मध्य जपानमध्ये रेल्वेसेवा रोखण्यात आली. जपानच्या हवामान विभागाने विक्रमी पावसाचा इशारा दिला आहे.