|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंड 28 वर्षांनंतर प्रथमच उपांत्य फेरीत

इंग्लंड 28 वर्षांनंतर प्रथमच उपांत्य फेरीत 

फिफा फुटबॉल विश्वचषक : प्रतिस्पर्धी स्वीडनला 2-0 फरकाने लोळवले

@ समारा एरेना / वृत्तसंस्था

हॅरी मॅग्वायर व डेले अली यांनी हेडरवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतल्यानंतर इंग्लंडने फिफा फुटबॉल विश्वचषकात प्रतिस्पर्धी स्वीडनला 2-0 अशा फरकाने सहजपणे लोळवले आणि उपांत्य फेरीत आपले स्थान अगदी थाटात निश्चित केले. इंग्लंडने तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेतील शेवटच्या 4 संघात स्थान मिळवले असून हॅरी व डेले या उभयतांनीही हेडरवरच गोल केले, हे या लढतीचे ठळक वैशिष्टय़ ठरले. रशिया-क्रोएशिया यांच्यातील विजेत्याशी त्यांची आता उपांत्य लढत रंगेल.

समारा एरेनावरील उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या सत्रातील पहिल्या 30 मिनिटात उभय संघांत बराच संघर्ष रंगला. त्यानंतर मॅग्वायरला एकदा आपल्या मार्करला चकवून हेडरवर गोल करण्याची नामी संधी आली आणि त्यानेही या संधीचे सोने करत इंग्लंडला खाते उघडून दिले. ऍश्ले यंगच्या जबरदस्त कॉर्नरवर हवेत झेपावत मॅग्वायरने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डचे उत्तम गोलरक्षण देखील त्यांच्या विजयात अर्थातच मोलाचे ठरले. तीन गोल वाचवणाऱया पिकफोर्डला सामनावीराचा बहुमान मिळाला. दुसऱया सत्रात त्याने मार्कस बर्गचा वेगवान फटका सहज थोपवल्यानंतर स्वीडनची निराशा झाली.

दुसऱया सत्रातच 59 व्या मिनिटाला डेले अलीने आणखी एका हेडरवर इंग्लंडसाठी दुसरा गोल केला आणि येथे स्वीडनचा संघ बराच पिछाडीवर फेकला गेला. जेसी लिनगार्डच्या उत्तम कॉर्नरवर डेले अलीने चेंडू गोलजाळय़ात धाडला. डेलेने गोलजाळय़ाचा वेध घेतला, तो इंग्लंडसाठी या विश्वचषकातील 11 वा गोल ठरला. यासह इंग्लंडने एखाद्या विश्वचषकात सर्वाधिक गोलच्या आपल्या मागील विक्रमाशी बरोबरी केली.

यापूर्वी, 1966 च्या विश्वचषकात इंग्लंडने 11 गोल केले होते आणि नंतर ते त्या स्पर्धेत जेतेपदाचे मानकरी देखील ठरले होते. यंदा उपांत्य फेरीत यश-अपयश आले तरी त्यांना आणखी दोन सामने खेळण्याची संधी मिळेल व यामुळे 11 पेक्षा अधिक गोल करत आपलाच मागील विक्रम मोडीत काढण्याची त्यांना नामी संधी असणार आहे.

यापूर्वी, 1990 च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत मजल मारणाऱया इंग्लंडने यंदा पुन्हा एकदा जेतेपदाच्या दिशेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. यापूर्वी, 1966 मध्ये त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली असली तरी नंतर मात्र त्यांच्या पदरी सतत निराशाच आली. त्याची कसर यंदा भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

स्वीडनचा विश्वचषकातील स्वप्नवत प्रवास संपुष्टात

यंदा रशिया विश्वचषकात स्थान संपादन करण्यापासून अगदी उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत स्वीडनने अतिशय स्वप्नवत कामगिरी केली होती. प्रारंभी, या स्पर्धेसाठी गतवर्षी झालेल्या पात्रता फेरीत त्यांनी इटलीला पराभवाचा जोरदार धक्का देत त्यांना स्पर्धेसाठी पात्रताही सिद्ध करु दिली नाही. त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेतील साखळी फेरीत जर्मनी, मेक्सिकोसारख्या दिग्गज संघांचा समावेश असताना देखील स्वीडनने फ गटात अव्वलस्थान संपादन करण्याचा पराक्रम गाजवला. उपउपांत्यपूर्व लढतीत त्यांनी स्वित्झर्लंडविरुद्ध आक्रमक पवित्र्यावर 1-0 अशा फरकाने यश खेचून आणले. पण, आता उपांत्यपूर्व फेरीत जिगरबाज इंग्लंडसमोर मात्र त्यांची काहीच मात्रा चालली नाही आणि या विश्वचषकातील त्यांचा स्वप्नवत प्रवास संपुष्टात आला.