|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गो-हत्या थांबवा…कत्तलखाने बंद करा

गो-हत्या थांबवा…कत्तलखाने बंद करा 

प्रतिनिधी / बेळगाव

गो-हत्या थांबवा, कत्तलखाने बंद करा, देशद्रोहींवर कारवाई करा, या मागण्यांसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी गो-हत्या आणि कत्तलखान्यांना पाठिंबा देणाऱया सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

गो-हत्या करणे म्हणजे गुन्हा आहे. तरीदेखील त्यांना पाठिशी घातले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे गो-हत्येविरोधात माहिती देणाऱया व्यक्तींवरच गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा त्याचा वेळीच विचार करावा, अन्यथा सर्वसामान्य जनताच कायदा हातात घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कणबर्गीजवळील ऑटोनगर येथे बेकादेशीररीत्या अनेक कत्तलखाने सुरू आहेत. त्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तरीदेखील त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते गो-हत्येविरोधात आवाज उठवत आहेत. म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

खंजर गल्ली व कॅम्प या ठिकाणी राजरोसपणे कत्तलखाने सुरूच आहेत. स्थानिक जनतेचा विरोध असताना सरकार या कत्तलखान्यांना पाठिंबा देत आहे. मात्र, यामुळे संपूर्ण हिंदुंचा हा अवमान असून हिंदु गप्प बसणार नाहीत, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. गो-हत्येविरोधात माहिती देणाऱयांना गुन्हेगार ठरविले जात आहे. या ठिकाणी पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामुळे निजद आणि काँग्रेस सरकार कसे देशद्रोहींना पाठिशी घालत आहे हे दिसून येत आहे. तातडीने अशा देशद्रोहींविरोधात कारवाई करावी, अन्यथा हिंदुच कायदा हातात घेतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

गो-हत्या करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील गो-हत्या सुरू आहेत. त्यामुळे एकप्रकारे कायदा पायदळी तुडविला जात आहे. याच बरोबर या कत्तलखान्यांमध्ये बांगला घुसखोरांना कामे दिली जात आहेत. हा देशद्रोह आहे. तेव्हा अशा कत्तलखान्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. यावेळी आमदार अनिल बेनके, खासदार सुरेश अंगडी, हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य यांच्यासह अनेक स्वामी आणि विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या नेत्यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

कन्नड साहित्य भवन येथून या मार्चाला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी एच. बुदेप्पा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामी, कृष्णाभट्ट, माजी आमदार संजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुनी, ऍड. एम. बी. जिरली, राजू चिक्कनगौडर यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.