|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोविंद गावडे यांची ढवळीकरांबाबतची विधाने अशोभनीय

गोविंद गावडे यांची ढवळीकरांबाबतची विधाने अशोभनीय 

प्रतिनिधी/ कुडचडे

सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना खाते नीट चालविता येत नाही व त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केलेली टीका अशोभनीय आहे, असे मत मगो पक्षाचे सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केले.

गोव्यातील सर्व परिसर ज्या प्रकारे राज्याचे भाग आहेत त्याचप्रमाणे आघाडी सरकारातील विविध घटकही एकमेकाचा हात पकडून उभे राहिलेले आहेत. याची जाणीव एकत्र आलेल्या सर्वांनी ठेवली पाहिजे तसेच ती एकी संभाळण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असे पाऊसकर यावेळी म्हणाले. राज्य व्यवस्थित चालावे यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे. तो पाठिंबा टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेच पाहिजेत, असे ते म्हणाले.

कित्येक वर्षांपासून सुदिन ढवळीकर हे सार्वजनिक बांधकामखाते व्यवस्थित हाताळत आहेत हे राज्यातील सर्वांना माहित आहे. त्याचे वेगळे विश्लेषण करण्याची गरज नाही. आज राज्यात बांधकाम खात्याच्या अंतर्गत कामे सुरळीतपणे चालू आहेत. तसेच आजपर्यंत ढवळीकर यांच्या खात्याच्या कारभारात वा खात्याच्या अखत्यारीतील कामांच्या बाबतीत गैरप्रकार घडलेला निदर्शनास आलेला नाही व यापुढेही येणार नाही. मगो हा गोव्याचा पक्ष आहे व आजपर्यंत या पक्षाने कोणताच काळिमा फासून घेतलेला नाही व यापुढेही फासू देणार नाही, असे आमदार पाऊसकर यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

नियंत्रण ठेवण्याची गरज

नैसर्गिक प्रकोप वा आपत्तीसमोर कोणीही काही करू शकत नाही व त्यांना रोखू शकत नाही. इतरांवर टीका करताना प्रत्येकाने याची जाणीव ठेवायला हवी. त्याचप्रमाणे सत्यपरिस्थिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एका मंत्र्यांनी दुसऱया मंत्र्यांबद्दल अशी विधाने करून जनतेची दिशाभूल करणे हे शोभत नाही. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कारण यापुढे सरकारला बराच कार्यकाळ पूर्ण करायचा आहे, याकडे पाऊसकर यांनी लक्ष वेधले. जनतेनेही अशा प्रकारांकडे लक्ष देऊ नये आणि स्वत:ची दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन पाऊसकर यांनी केले.