|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चोर्ला घाट परिसरात पर्यटकांचा धिंगाणा सुरुच

चोर्ला घाट परिसरात पर्यटकांचा धिंगाणा सुरुच 

 

प्रतिनिधी / वाळपई

पावसाळी हंगामात चोर्लाघाट परिसरात कोसळणाऱया धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी काल रविवारीही पर्यटकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. संबंधित यंत्रणेने बंदोबस्त ठेवूनही या पर्यटकांनी घाट परिसरात दारु पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे सदर यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसून आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.

गेल्या दोन दिवसांपासून सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळय़ा भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून कोसणाऱया धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटकांनी गर्दी करीत आहेत. अशाच प्रकारे काल रविवारी धबधब्यांवर गर्दी झाली होती. यावेळी काही पर्यटकांनी दारु पिऊन धिंगाणा घातल्याने याचा परिणाम अनेक निसर्गप्रेमींवर झाला. बिनधिक्कतपणे दारु पिऊन व दारुच्या बाटल्या हातात घेऊन फिरणाऱया पर्यटकांवर कारवाई करण्यास संबंधित यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून आले.

पावसाळय़ात धबधब्यांवर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱया पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. याबाबत गंभीर दखल घेत डिचोली उपजिल्हाधिकाऱयांनी पावसाळय़ापूर्वी एक बैठक घेऊन अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश पोलीस, वाहतूक पोलीस, अबकारी व इतर खात्यांना दिले होते. याबाबतची अंमलबजावणीही गेल्या आठवडय़ापासून सुरु झाली होती. मात्र काल रविवारी चोर्ला घाट परिसरातील धबधब्यांवर काही पर्यटकांनी दारु पिऊन धिंगाणा व हुल्लडबाजी करीत सरकारच्या या यंत्रणेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

 धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी निसर्गप्रेमी मोठय़ा संख्येने गर्दी केल्याने चोर्ला घाटमार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी काही पर्यकांनी धिंगाणा घालत वाहतुकीला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मार्गावरून जाणाऱया वाहनांची तपासणी अबकारी खात्याच्या यंत्रण करीत होती. तरीही घाट परिसरातील धबधब्यांवर काही पर्यटकांनी दारु पिऊन धिंगाणा घातला. वाळपई अबकारी खात्याच्या यंत्रणेने वाहनांची तपासणी करूनही चोर्ला घाट परिसरात पर्यटकांकडून धिंगाणा घालण्याचा प्रकार कसा घडला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वाहनांची कसून तपासणी : विभूती शेटय़े

यासंदर्भात वाळपई अबकारी खात्याचे निरीक्षक विभूती शेटय़े यांच्याशी संपर्क साध्ला असता त्यांनी सांगितले की, अबकारी खात्याच्या तपास यंत्रणेने केरी येथून चोर्ला घाटमार्गाकडे जाणाऱया वाहनांची तपासणी केली आहे. यावेळी कोणालाही दारुची वाहतूक करण्यास दिली नाही. धबधब्यांवर धिंगाणा घालणाऱया या पर्यटकांना दारुची व्यवस्था सुर्ला सत्तरी गावामधून झाल्याचा संशय व्यक्त केला.

वाहतुकीला अडथळा होऊ दिला नाही : शिवराम

पोलीस निरीक्षक शिवराम यांच्याशी संपर्क साधला असता, घाट परिसरात पोलीस गस्त ठेवण्यात आली होती. सध्या वाळपई पोलीस स्थानकांतील कर्मचाऱयांना राष्ट्रपती भेटीच्या वेळी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आल्याने गस्त अधिकप्रमाणात होऊ शकली नाही. तरीही तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱयांनी व्यवस्थित बंदोबस्ताची प्रक्रिया पूर्ण करीत महामार्गावरील वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ दिला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: