|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची पुनर्विचार याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची पुनर्विचार याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे या तिघांच्या गळय़ाभोवतीचा फास आणखी घट्ट झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोषींच्या पुनर्विचार याचिकेमुळे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का? की त्यांची शिक्षा शिथील होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर भानुमती आणि अशोक भूषण यांनी दोषी विनय, पवन आणि मुकेश यांच्या पुनर्विचार याचिकेवर निकाल राखून ठेवला होता. तर या प्रकरणातील चौथा दोषी अक्षयनं पुनर्विचार याचिका दाखल केलेली नव्हती. निर्भया प्रकरणात उच्च न्यायालयानं दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी मुकेश पवन आणि त्याचा वकिल एमएल शर्मा यांनी 15 मार्च 2014 रोजी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर इतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयानं नोटीस जारी करत 5 मे 2017 रोजी फाशीवर स्थगिती आणली होती. सहा आरोपींपैकी एक राम सिंहने तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर सहावा आरोपी अल्पवयीने असल्याने त्याला तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

Related posts: