|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जमीन विक्रीच्या वादातून पिस्तुल रोखले

जमीन विक्रीच्या वादातून पिस्तुल रोखले 

चाकूनेही हल्ला : मालवण शहरातील घटनेने खळबळ : दोघे युवक ताब्यात

वार्ताहर / मालवण:

मालवणात एका वादातून पिस्तुल रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. पिस्तुल रोखणाऱया शुभम संतोष जुवाटकर (21, रा. दांडी) याच्यासह आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभमकडे पिस्तुलचा परवाना आहे का?, मालवणात पिस्तुल आणले कुठून? याच्या तपासात पोलीस यंत्रणा दिवसभर गुंतली होती. सायंकाळी उशिरापर्यंत संशयित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, पिस्तुल ताब्यात घेण्यात आले नव्हते. जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील कमिशन वसुलीच्या वादातून पिस्तुल रोखल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली.

  तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी तातडीने कार्यवाही करीत संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्या दोघांनाही मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. हा वाद जमीन विक्री व्यवहारातून घडल्याची माहिती पुढे आली आहे.

रविवारी रात्रीची घटना

दिनेश साळकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, कोल्हापूर येथील जमीन विक्रीच्या व्यवहारातील दोन लाख रुपये आपल्याला न मिळाल्याने राजेश खडपे याच्यावर रक्कम वसुलीची जबाबदारी देण्यात आली होती. राजेश खडपे याच्यातर्फे शुभम संतोष जुवाटकर याने ही वसुलीची जबाबदारी घेतली होती. 8 जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास राजेश खडपेने फोन करून वायरी येथे आपल्याला बोलावून घेतले व बिअरची मागणी केली. नंतर आपण राजेश व त्याचा लहान भाऊ, शुभम जुवाटकर असे एकत्रित बिअर पित असताना रात्री 10 वाजता आमच्यात वाद झाला. यावेळी राजेश खडपे व त्याच्या लहान भावाने मला पकडून धरले. त्याचवेळी शुभम जुवाटकरने पँटच्या पाठीमागे खोवलेली पिस्तुल काढून ‘तानाजी भंडारी यांना दिलेल्या धमकीच्या बदल्यातील पैसे आता दे, नाही तर तुला याच पिस्तुलने ठार मारून टाकीन,’ अशी धमकी देऊन पिस्तुल माझ्या डाव्या कानशिलाकडे धरली.  त्याने डाव्या हाताने बिअरची बाटली अर्धी फोडून ती बाटली माझ्या उजवीकडील कानशिलाकडे मारून दुखापत केली. ही सर्व घटना वायरी येथील बिअर शॉपीच्या परिसरात घडली.

पळून जात असताना चाकूने हल्ला

आपल्या डोक्यावर बिअरची बाटली फोडल्यानंतर पळून जात असताना पुन्हा राजेश खडपे व त्याच्या भावाने मला पकडले व शुभम जुवाटकर याने स्वत:कडे ठेवलेला चाकू काढून उजव्या खांद्यावर वार केला व जीवे मारण्याची धमकी दिली, असे दिनेश साळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. दिनेश यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी फिर्याद देताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.

वसुलीच्या वादातून मारहाण

जमीन विक्री व्यवहारातील कमिशनच्या वादातून ही मारहाण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दाखल तक्रारीनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. यातून  शहरात वसुलीसाठी युवकांना काही पैशांच्या बदल्यात जबाबदारी दिली जात असल्याच्या प्रकारांवर प्रकाश पडणार आहे. अशा वसुलीत कोण-कोण गुंतले आहेत, याचीही माहिती समोर येणार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

गुन्हा दाखल, संशयित ताब्यात

दिनेश दत्ताराम साळकर (35, रा. हडी साळकरवाडी) यांच्यावर शुभम संतोष जुवाटकरने पिस्तुल रोखल्याची घटना रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी शुभम संतोष जुवाटकर (21, रा. दांडी), राजेश खडपे (24, रा. दांडी मालवण) यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर भादंवि कलम 326, 506, 34, शस्त्र अधिनियम 25 (1 ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही संशयितांना मंगळवारी मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तपास पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.

शुभम संतोष जुवाटकर कोण आहे?

शुभम जुवाटकर हा शहरातील गवंडीवाडा भागातील संतोष जुवाटकर यांचा मुलगा. त्याचे शिक्षण मुंबईत झाले आहे. संतोष मालवणातील माजी नगरसेवक राजन सरमळकर यांच्यावर करण्यात आलेल्या खुनी हल्ल्यातील संशयित आरोपी आहे. आता त्याच्या मुलाकडे पिस्तुल असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्याने शहरात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.